ठाण्यात 25 महिला रिक्षाचालक सज्ज! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

ठाणे - ठाण्यातील प्रवास सुरक्षित आणि सुसह्य होण्यासाठी 25 महिला रिक्षाचालकांच्या अबोली रिक्षा सज्ज झाल्या आहेत. शुक्रवारपासून (ता.6) त्यांचा शहरातील प्रवास सुरू होणार आहे. वायफाय, वायफाय रेडिओ, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, मोबाईल चार्जिंगची सोय, फॅन, वर्तमानपत्र, सामान ठेवण्यासाठी विशेष सोय आणि वाचनासाठी हेड लाईटची व्यवस्था अशा सोई रिक्षात आहेत. विशेष म्हणजे या रिक्षांमध्ये बसवण्यात आलेल्या पॅनिक बटनाच्या साह्याने आपत्कालीन काळात मदत मिळवणे रिक्षातील महिलांना शक्‍य होणार आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रिक्षांचे वितरण होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी बुधवारी दिली. 

ठाण्यातील महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी महिला रिक्षाचालकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने घेतली होती. त्यासाठी परिवहन विभागाकडून महिलांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने याअंतर्गत परमिटचे वाटप केले. या योजनेंर्तगत महिला रिक्षाचालकांना रोजगार देण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी पुढाकार घेतला आहे. रिक्षा-व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांची निवड करून त्यांना वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना लायसन्स देण्यात आले आहे. या महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी स्वस्त दरामध्ये कर्ज दिले आहे. शुक्रवारपासून अबोली रिक्षा रस्त्यांवर दिसणार आहेत. 

परिवहन सचिव सोनिया सेठी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून महिलांना कर्जपुरवठा मिळाला आहे. खादी व ग्रामोद्योग कार्यालयांतर्गत पंतप्रधान रोजगार योजनेतून स्वयंरोजगारासाठी या महिलांना 20 टक्‍क्‍यांचे अनुदान मिळाले आहे. दोन लाख दोन हजारांचे कर्ज रिक्षासाठी मंजूर झाले आहे. खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून प्रत्येकीला 46 हजार देण्यात आले आहे. नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या साह्याने या महिला या योजनेमध्ये सहभागी झाल्या आहेत. 

सुरक्षेची हमी 
ठाण्यामध्ये दाखल झालेल्या नव्या अबोली रिक्षांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून यामध्ये आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचवण्यासाठी पॅनीक बटनही आहे. महिला चालक अथवा महिला प्रवासी संकटात असल्यास रिक्षाचालक महिला हे बटन दाबून आपल्या ठिकाणाची माहिती वाहतूक पोलिस नियंत्रण कक्ष, पोलिस नियंत्रण कक्ष आणि घरच्या व्यक्तींना त्वरित देऊन मदत मागवू शकते. पोलिसांना या रिक्षापर्यंत पोहोचणे यामुळे शक्‍य होणार आहे.

Web Title: 25 women autorickshaw driver