मुंबई विद्यापीठाला 25 हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई - उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी 2010 ते 2017 दरम्यान घेतलेली रक्कम आणि होणारा खर्च याबाबतचा तपशील आरटीआय (माहिती अधिकार) अधिनियमांतर्गत देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राज्य माहिती आयोगाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही माहिती आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

विद्यार्थी आकाश वेदक याने मुंबई विद्यापीठाकडून 2010 ते 2017 या काळात उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी घेण्यात आलेली एकूण रक्कम आणि त्यासाठी झालेला खर्च याबाबतचा तपशील माहिती अधिकारात मिळावा, यासाठी अर्ज केला होता. विद्यापीठाने माहिती न दिल्यामुळे त्याने राज्य माहिती आयोगाकडे अपील केले. त्यानंतरही मुंबई विद्यापीठाने माहिती दिली नाही. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीवेळी आयोगाने मुंबई विद्यापीठाला 25 हजारांचा दंड ठोठावला. कुलगुरूंनी या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेशही दिला.

Web Title: 25000 Fine to Mumbai University