गरजू रुग्णांना मिळणार २५ हजार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 July 2019

मुंबईतील गरजू रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यापूर्वी अशा निधीमधून प्रत्येकी पाच हजार रुपये मदत केली जात होती. त्या रकमेत तब्बल आठ वर्षांनी भरघोस वाढ करून ती आता २५ हजार रुपये इतकी करण्याचा निर्णय महापौर आर्थिक निधी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

मुंबई - मुंबईतील गरजू रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यापूर्वी अशा निधीमधून प्रत्येकी पाच हजार रुपये मदत केली जात होती. त्या रकमेत तब्बल आठ वर्षांनी भरघोस वाढ करून ती आता २५ हजार रुपये इतकी करण्याचा निर्णय महापौर आर्थिक निधी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. 

महापौर निधीमधून २०११ पासून प्रत्येक गरजू रुग्णाला पाच हजार रुपये इतकी मदत केली जात होती. महापौर निधी समितीची बैठक होत नसल्याने व महापौर निधीमध्ये वाढ होत नव्हती. महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळण्याच्या अपेक्षेने मुंबईकर मोठ्या प्रमाणात महापौरांकडे अर्ज करतात. मात्र, निधी नसल्याने गरजू रुग्णांना जास्त रक्कम देता येत नव्हती.

महापौर निधीमधून देण्यात आलेले पाच हजार रुपयांचे धनादेश अनेक रुग्णालयांत स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे महापौर मदत निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी संगितले.

बैठकीत रुग्णांना देण्यात येणारी रक्कम पाचवरून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. बायपास आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी २५ हजार रुपये इतकी मदत देण्याचा निर्णयही घेण्यात आला. मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी सध्या महापौर निधी अत्यंत तुटपुंजा आहे. त्यामुळे अधिकाधिक गरजू रुग्णांना मदत करता येत नव्हती.

निधीसाठी नगरसेवकांचे मानधन
सर्व २२७ नगरसेवकांना त्यांचे एक महिन्याचे मानधन महापौर निधीमध्ये जमा करण्याचे आवाहन केले जाणार आहे. नगरसेवकांना दरमहा २५ हजार रुपये इतके मानधन दिले जाते. त्यामधून ५६ लाखांचा निधी जमा होईल. दानशूर व्यक्ती आणि मोठ्या कंपन्यांशीही संपर्क साधला जाणार आहे. ‘महापौर रजनी’सारख्या कार्यक्रमातून वर्षभरात पाच कोटी जमा केले जाणार असल्याची माहिती यशवंत जाधव यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25000 Rupees to Need Patient