बेस्टवर 26 कोटींचा भार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - बेस्ट उपक्रम अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांनी तोट्यात आहे. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी वारंवार केलेल्या इंधन दरवाढीमुळे बेस्टच्या तिजोरीवर वर्षभरात तब्बल 26 कोटी 13 लाखांचा आर्थिक भार पडणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला हा मोठा फटका असेल. 

मुंबई - बेस्ट उपक्रम अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांनी तोट्यात आहे. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी वारंवार केलेल्या इंधन दरवाढीमुळे बेस्टच्या तिजोरीवर वर्षभरात तब्बल 26 कोटी 13 लाखांचा आर्थिक भार पडणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला हा मोठा फटका असेल. 

इंधनाच्या किमती वारंवार वाढत असल्याने त्याचा सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. कोट्यवधींच्या तोट्यात चालणाऱ्या बेस्टला त्याचा फटका बसत आहे. इंधन दरवाढीची स्थिती कायम राहिल्यास बेस्टला दरवर्षी 26 कोटींचा फटका बसेल, अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी समितीच्या बैठकीत दिली. कॉंग्रेसचे सदस्य भूषण पाटील यांनी आजच्या बैठकीत इंधन दरवाढीमुळे बेस्टवर काय परिणाम झाला, याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्याकडे मागितली. त्यावर दर तीन महिन्यांनी ही माहिती दिली जाते, असे उत्तर बागडे यांनी दिले. 

महसुलात 1 कोटींची कपात 
आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट परिवहन विभागाला दिवसाला 3 कोटी 25 लाखांचा महसूल मिळत होता. मात्र, आता दोन कोटी 25 लाखांचा महसूल मिळत आहे. प्रवाशांसह महसूलही कमी झाल्याने दिवसाला एक कोटींचे नुकसान बेस्टला सहन करावे लागत आहे, असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठकीत केला. 

महाव्यवस्थापक पद रद्द करण्याची मागणी 
काही वर्षांपासून बेस्ट तोट्यात आहे. योग्य नियोजन केले जात नसल्याने भविष्यात असाच कारभार सुरू राहिल्यास बेस्टला टाळे ठोकावे लागेल. महाव्यवस्थापक आपलाच कारभार हाकत आहेत. अन्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीही दिली जात नाही. त्यामुुळे महाव्यवस्थापक पद रद्द करावे, अशी सूचना भाजपचे नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी बैठकीत केली. 

Web Title: 26 crores load on best