‘इमिजिएट सपोर्ट व्हेईकल’ची अद्याप प्रतीक्षा

Boat
Boat

मुंबई २६/११ च्या हल्ल्यानंतर न्यूझीलंडवरून नवीन १५ सी लेग बोटी आणण्यात आल्या होत्या; पण कमी क्षमतेच्या या बोटी पांढरा हत्ती ठरल्या. अखेर सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्य सरकारकडे नवीन आणि अत्याधुनिक बोटींची मागणी केली होती. त्यानुसार लवकरच ‘इमिजिएट सपोर्ट व्हेईकल’ बोटी राज्य पोलिस दलात दाखल होणार आहेत. या बोटी इंग्लडमधून खरेदी करण्यात येणार आहेत.

२६/११च्या वेळी मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतरही गेल्या १० वर्षांत सागरी सुरक्षेत फारशी प्रगती झाली नाही. मुंबईसह राज्याला ७२० किलोमीटरचा सागरीकिनारा लाभलाय; पण त्याची सुरक्षा करण्यासाठी फक्त २१ सागरी पोलिस ठाणे आहेत. ५ मुंबई, ५ ठाणे ग्रामीण, ५ रायगड जिल्हा, ६ सिंधुदुर्ग, ५ रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. ३६ कोस्टल चौक्‍या, २२ नौका आणि ७ स्पीड बोटी असल्या, तरी त्यांच्याकडील बहुतेक साधनेही जुनी आणि नादुरुस्तच आहेत. 

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्यानंतर २००९ मध्ये मुंबई पोलिसांना ‘फास्ट पेट्रोलिंग सर्व्हिस’ १५ स्पीड बोटी देण्यात आल्या होत्या. या बोटींद्वारे पोलिस हे समुद्रात गस्त घालत होते मात्र कालांतराने या बोटींची क्षमता कमी असल्यामुळे गस्त घालण्यात अडचणी येऊ लागल्या. या बोटी ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने पाण्यात जरी धावू शकत असल्या, तरी ५ नॉटिकल अंतरापेक्षा त्या खोल समुद्रात जाऊ शकत नव्हत्या. उथळ समुद्रात या बोटी पाण्यात थांबू शकत नाहीत. तसेच, ४ ते ५ तासांपेक्षा अधिक काळ त्या पाण्यात थांबू शकत नव्हत्या. अवघ्या १६ माणसांची क्षमता ही सुद्धा मोठी मर्यादा होती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन समुद्री सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्य सरकारकडे नवीन आणि अत्याधुनिक बोटींची मागणी केली आहे. 

या नव्या अत्याधुनिक ‘इमिजिएट सपोर्ट व्हेईकल’ बोटी ‘रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ नेव्हल आर्चीट’ या कंपनीकडून येणार आहेत. सध्या अशी बोट ओएनजेसी आणि नेव्हीच्या अधिकाऱ्यांकडे आहे. 

‘इमिजिएट सपोर्ट व्हेईकल’ ही बोट ओएनजेसीने पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतली असून, त्याचे दिवसाचे भाडे एक लाख ७० हजार आहे. या बोटी लवकरच महाराष्ट्र पोलिस दलाला मिळणार असून, त्यामुळे समुद्री सुरक्षा अधिक बळकट होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

२०० नॉटिकल मैलपर्यंत गस्त 
लंडन बनावटीच्या ‘इमिजिएट सपोर्ट व्हेईकल’ बोटींची क्षमता सागरी सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे. या बोटीद्वारे २०० नॉटिकल मैल खोल समुद्रात गस्त घालणे शक्‍य होणार आहे. त्याचबरोबर ताशी २५ किलोमीटर वेगाने ही बोट धावणार असून, या बोटवर एकाच वेळी ३४ जण प्रवास करू शकतात. तसेच समुद्रात सात दिवस ही बोट थांबू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com