वाशी एपीएमसी निवडणुकीसाठी 263 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

29 फेब्रुवारी रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 24 ते 29 जानेवारी या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत होती. बुधवारी (ता.29) अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 263 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

नवी मुंबई : 29 फेब्रुवारी रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. याद्वारे 12 शेतकरी प्रतिनिधी, 5 व्यापारी प्रतिनिधी आणि माथाडी व मापाडी गटात प्रत्येकी एका घटक प्रतिनिधीची निवड करण्यात येणार आहे. 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 24 ते 29 जानेवारी या कालावधीत अर्ज भरण्याची मुदत होती. बुधवारी (ता.29) अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 263 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 

ही बातमी वाचली का? म्हाडाच्या घराचे स्वप्न साकार होणार!

या निवडणुकीत फळबाजार समितीकरिता संजय पानसरे आणि माथाडी व मापाडी गटांतून शशिकांत शिंदे या दोघांची निवड बिनविरोध होणार आहे. राज्यात झालेली विधानसभेची निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे एपीएमसी निवडणुकीच्या निमित्ताने पालिका निवडणुकीपूर्वीच शहरातील राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल असणाऱ्या या बाजारपेठेच्या प्रतिनिधींची (संचालक) निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मंगळवारपर्यंत (ता.28) 181 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते; तर बुधवारी (ता.30) अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 263 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. 

ही बातमी वाचली का? वाशी ते घाटकोपर प्रवास गारेगार!

चुरशीची लढत 
भाजीपाला बाजार समितीकरिता माजी संचालक शंकर पिंगळे आणि के. डी. मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रताप चव्हाण, आप्पासाहेब शिरकर यांनीदेखील अर्ज दाखल केले आहेत. तर कांदा-बटाटा बाजार समितीत माजी संचालक अशोक वाळुंज, सुरेश शिंदे, किरण शिंदे, भूषण वाळुंज, राजेंद्र शेळके, मनोहर तोतलानी यांनी अर्ज दाखल केले. यात अशोक वाळुंज आणि राजेंद्र शेळके यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. 

ही बातमी वाचली का? या जिल्ह्यात प्लास्टिक हटवण्यासाठी निधी

यांचे अर्ज दाखल 
मसाला बाजार समितीतून मसाला मार्केटचे माजी संचालक कीर्ती राणा यांनी अर्ज दाखल केले. तर अखेरच्या दिवशी प्रतिस्पर्धी अशोक जैन, विजय भुतडा अर्ज दाखल करत रिंगणात उतरले. धान्य बाजार समिती समितीच्या नीलेश विरा, महेंद्र गजरा, भिमजी भानुशाली, अमरजी काजीया, पोपट भंडारी यांचे अर्ज दाखल झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 263 candidates filed forms for Vashi APMC election