उपनगरांत पाच महिन्यांत 282 आत्महत्या

मंगेश सौंदाळकर
रविवार, 14 मे 2017

महिला, तरुणांची संख्या अधिक

महिला, तरुणांची संख्या अधिक
मुंबई - नैराश्‍य, आर्थिक अडचणी, व्यसनाधीनता, कामाच्या ठिकाणचा ताण-तणाव, कामाच्या अनिश्‍चित वेळा, कौटुंबिक समस्या आदी कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत शहरापेक्षा उपनगरांत हे प्रमाण अधिक आहे. उपनगरांत पाच महिन्यांत 226 जणांनी गळफास घेऊन; तर 56 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. असे टोकाचे पाऊल उचलणाऱ्यांमध्ये महिला आणि तरुणांची संख्या अधिक आहे.

मध्य उपनगरांपेक्षा पश्‍चिम उपनगरांत आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे. पश्‍चिम उपनगरांत वांद्रे ते दहिसरदरम्यान 161 जणांनी आत्महत्या केल्या. मालाड, गोरेगाव, कांदिवली व बोरिवली परिसरात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. या भागांत आठ दिवसांत एक तरी आत्महत्येची घटना उघडकीस येते.

नशीब आजमावण्यासाठी मुंबईत अनेक जण येतात. स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण, कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. एखादी गोष्ट लवकर न मिळाल्यास अनेकांची चिडचिड वाढते. त्यातून येणारे नैराश्‍य दूर करण्यासाठी अनेक जण व्यसनाधीन होतात. व्यसनामुळे त्यांचे मेंदूवरील नियंत्रण कमी होते. आत्महत्येचे विचार मनात येतात, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी मालाडमध्ये एका तरुणाने आईकडे खर्चाकरता पैसे मागितले होते. ते न मिळाल्याने त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

वर्ष आत्महत्या
2013 1,302
2014 1,196
2015 1,122
(मुंबई पोलिसांनी दिलेली आकडेवारी)

पाच महिन्यांतील आत्महत्या (शवविच्छेदन केंद्रांतील आकडेवारी)
राजावाडी रुग्णालय - 88 (गळफास - 65, विषप्राशन - 23)
कूपर रुग्णालय - 67 (गळफास - 55, विषप्राशन - 12)
भगवती रुग्णालय, बोरिवली - 77 (गळफास - 61, विषप्राशन - 16)
सिद्धार्थ रुग्णालय, गोरेगाव - 61 (गळफास - 45, विषप्राशन -15)

गेल्या वर्षी झालेल्या आत्महत्या (शवविच्छेदन केंद्रांतील आकडेवारी)
सिद्धार्थ रुग्णालय - 108,
कूपर रुग्णालय - 129
भगवती रुग्णालय - 63

Web Title: 282 suicide in mumbai