मुंबईत प्राप्तिकर छाप्यांत 29 कोटी जप्त 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तिकर विभागाने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून 29 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तिकर विभागाने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून 29 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली. प्राप्तिकर विभाग मौल्यवान वस्तू व रोख रकमेच्या देवाणघेवाणीवर लक्ष ठेवून आहे. 

प्राप्तिकर विभागाने मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांतील संवेदनशील ठिकाणी जलद प्रतिसाद पथके (क्विक रिस्पॉन्स टीम) तैनात केली आहेत. राज्यात सोमवारी (ता. 21) मतदान होणार असून, तोपर्यंत जलद प्रतिसाद पथके दररोज 24 तास कार्यरत राहणार आहेत. कोणाकडून पैशांच्या वाटपाबाबत विश्‍वसार्ह माहिती मिळाल्यावर राज्य पोलिसांचे सहकार्य घेऊन कारवाई करण्यात येत आहे. इतर संस्थांशी समन्वय साधून कार्य केले जात आहे, असे प्राप्तिकर विभागाच्या मुंबई विभागाने सांगितले. 

विधानसभा निवडणूकमुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात; तसेच या काळात पैशाचा गैरवापर होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तिकर- 1 (अन्वेषण) मुंबईचे मुख्य संचालक यांना राज्यासाठी प्राप्तिकर विभागाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 29 crores seized in income tax in Mumbai