कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास शाळेच्या मागची संरक्षण भिंत अचानक कोसळली. संरक्षण भिंतीचा काही भाग लगतच असलेल्या दोन घरांवर पडल्याने ढिगाऱ्याखाली 4 लोक अडकले होते.

कल्याण : कल्याणमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात नॅशनल उर्दू शाळेची सिमाभींत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास शाळेच्या मागची संरक्षण भिंत अचानक कोसळली. संरक्षण भिंतीचा काही भाग लगतच असलेल्या दोन घरांवर पडल्याने ढिगाऱ्याखाली 4 लोक अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलिस, अग्निशमन दलाच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये एक 3 वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. जखमी झालेल्या एका तरुणीवर कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. मयतांची नावे करीना मोहम्मद चांद (25 वर्ष), हुसेन मोहम्मद चांद (3 वर्ष), शोभा कचरू कांबले (60 वर्ष) आणि जखमी तरुणीचे नाव आरती कर्डीले 16 वर्ष आहे. या संपूर्ण घटनेनंतर कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 dead in wall collapse incident in Kalyan