दिवसभरात हाेताेय तीन ऋतूंचा अनुभव!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सध्या तीन ऋतूंचा अनुभव माणगावकरांना मिळत आहे. सकाळच्या वेळेस दाट धुक्‍यांची चादर, दुपारी कडक ऊन, तर सायंकाळी पावसाची हजेरी लागत असल्याने नागरिकांना बदलत्या निसर्गाचे चक्र दिवसभरात पाहायला मिळत आहे.

माणगाव (बातमीदार) : सध्या तीन ऋतूंचा अनुभव माणगावकरांना मिळत आहे. सकाळच्या वेळेस दाट धुक्‍यांची चादर, दुपारी कडक ऊन, तर सायंकाळी पावसाची हजेरी लागत असल्याने नागरिकांना बदलत्या निसर्गाचे चक्र दिवसभरात पाहायला मिळत आहे. अशा बदलत्या वातावरणामुळे मात्र आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे डॉक्‍टरांनीही व्यायाम, प्राणायम आणि हलक्‍या आहाराचा सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. 

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे चक्र अव्याहत चालू असते; मात्र या वर्षी या चक्रात बदल झाला असून, एकाच दिवसात तीन ऋतूंचा अनुभव सर्वसामान्यांना येत आहे. निसर्गाचे चक्र कधी बदलत नाही असे म्हणतात; मात्र त्याला हे वर्ष अपवाद ठरते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात सुरू झालेला पाऊस साधारणपणे ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला थांबलेला असतो. त्यानंतर हिवाळ्याला सुरुवात होते. ऑक्‍टोबर महिन्यात कडक उन्हाळा, सकाळ संध्याकाळ थंडी असे गुलाबी वातावरण तयार होते. या वर्षी मात्र नोव्हेंबर महिना सुरू होऊन आठवडा उलटून गेला, तरी परतीचा पाऊस थांबला नाही. चक्रीवादळांमुळे पावसाचा परतीचा प्रवास लांबत चालला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सकाळ, दुपार व संध्याकाळ हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या तीनही ऋतूंचा अनुभव येत आहे. सकाळी सर्वत्र दाट धुक्‍याची चादर परिसरात असते, दुपारी उष्णता 36 अंश सेलिअंश तापमान असते आणि संध्याकाळी ढगांच्या गर्जनेसह विजांचा कडकडाट व पाऊस पडतो. बदललेल्या या वातावरणाचा पर्यावरण, निसर्ग व मानवी जीवनावर परिणाम होत असून, प्राणिमात्रांचे आरोग्यासाठी असे वातावरण प्रतिकूल असल्याचे मत जाणकार व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करत आहेत. या बदलत्या वातावरणात सर्वांनीच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे. सर्दी, पडसे, ताप व डोकेदुखी असे साथीचे आजार या दिवसांत उद्‌भवू शकतात; मात्र घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञ डॉक्‍टरांनी सांगितले आहे. 

रुग्णांमध्ये वाढ 
उपजिल्हा रुग्णालयात ओ.पी.डी.मध्ये यापूर्वी 250 रुग्ण सर्दी, पडसे आदी आजारांसाठी नोंदणी होत होती. मात्र, गेल्या काही दिवसांत यामध्ये काही अंशी वाढ होऊन 10 ते 20 रुग्ण वाढत आहेत. वातावरणाच्या बदलामुळे बाहेर पडणारे विंचूचे प्रमाण अधिक आहे. या विंचू दंशावरील रुग्णांची संख्याही वाढत आहे. 

समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अशी स्थिती निर्माण होत आहे. अपवादात्मक परिस्थितीत अशी स्थिती निर्माण होते. घाबरण्यासारखे काही नाही मात्र सर्वांनी काळजी घ्यावी. दाबाचे पट्टे सुरळीत झाल्यावर पूर्वीसारखे वातावरण होईल. 
भरत काळे, भूगोल शिक्षक, अभ्यासक 

वातावरण बदलाचा हा परिणाम आहे. या वातावरणात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. घाबरण्यासारखे गंभीर नाही. ऋतू नेहमीप्रमाणे सुरू झाल्यावर हे प्रमाण कमी होईल. जास्त उन्हात जाणे टाळावे, अतिथंड, बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत. योग्य ती काळजी घेतल्यास साथीच्या आजारातून बचाव करता येईल. पचनशक्ती वाढवणे व हलका व्यायाम, प्राणायाम केल्यास आरोग्य उत्तम राहील. ऋतू बदलताना आरोग्यावर परिणाम होतो त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. 
डॉ. नीलकंठ खडतर, एम.डी. (आयु.), माणगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 season in one day