२३ आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

२३ आठवड्यांचा गर्भ काढून टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. गर्भाची स्थिती चिंताजनक असल्याचा वैद्यकीय अहवाल संबंधित महिलेने सादर केला होता. 

मुंबई : २३ आठवड्यांचा गर्भ काढून टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. गर्भाची स्थिती चिंताजनक असल्याचा वैद्यकीय अहवाल संबंधित महिलेने सादर केला होता. 

गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यास कायदेशीर परवानगी असते. त्याहून अधिक काळानंतर गर्भपात करण्यासाठी उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळणे बंधनकारक आहे. त्यामुळे २३ आठवड्यांची गर्भवती असलेल्या महिलेने उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर न्या. अकिल कुरेशी आणि न्या. एस. जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

संबंधित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारच्या भायखळा येथील जे. जे. रुग्णालयाला दिले होते. गर्भाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला होता. गर्भात अपंगत्व निर्माण होण्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली होती. या अहवालाच्या आधारे उच्च न्यायालयाने संबंधित महिलेला गर्भपात करण्यास परवानगी दिली आणि शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला तसे निर्देश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 weeks abortion allowed