
Mumbai : हैड्रोजन टाकीचा स्फोट होऊन ३ कर्मचारी जखमी; पालिकेचा खर्च देण्यास नकार
मुंबई : मलबार हिल येथील वॉटर सप्लाय डिपार्टमेंट मध्ये हैड्रोजन टाकीचा स्फोट होऊन ३ कर्मचारी जखमी झाले. त्यातील जोतिबा गुरव हे गंभीर रित्या जखमी असून त्यांच्यावर जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. त्यांच्यावर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज असून त्यासाठी मोठा आर्थिक खर्च येणार आहे. मात्र पालिकेने हा खर्च देण्यास नकार दिल्याने या कर्मचाऱ्याची उपचारासाठी परवड सुरू असल्याचे दिसते.
मलबार हिल येथील वॉटर सप्लाय डिपार्टमेंट मध्ये गुरुवारी हैड्रोजन टाकीचा स्फोट होऊन ३ कर्मचारी जखमी झाले. त्यातील इतर दोघांना किरकोळ जखमा झाल्या असून ज्योतिबा गुरव मात्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तातडीची एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.त्या व्यतिरिक्त अजून दोन शस्त्रक्रियेची त्यांना गरज आहे.
मात्र यासाठी मोठा आर्थिक भार उचलावा लागणार आहे. या सर्व प्रक्रियेचा आर्थिक बोजा त्यांचे गरीब कुटुंबीय सहन करू शकत नाहीत. ज्योतिबा गुरव हे आपले कर्त्यव्य बजावत असताना, त्यांची कोणतीही चूक नसताना वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करत होते. हे काम करत असताना ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
ज्योतिबा गुरव यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी साडे पाच लाखाहून अधिक खर्च आहे. तरी त्यांना येणारा जो वैद्यकीय खर्च आहे तो पूर्णपणे महापालिकेने द्यावा तसेच ते पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांना पूर्ण पगारी रजा मंजूर करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून व नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
मात्र गुरव यांच्याकडे वैद्यकीय गटविमा योजना,तसेच वैयक्तिक विमा पॉलीसी नसल्याने त्यांना हा खर्च देता येणार नसल्याचे आयुक्तांनी कामगार संघटनांना कळवले आहे.मात्र यामुळे गुरव यांची परवड सुरू असून आयुक्तांनी यात लक्ष घालून योग्य ती कारवाही करावी अशी विनंती गुरव यांचे नातेवाईक अवधूत कोरे यांनी केली आहे.