शाळेकडून 30 विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

दहिसर येथील रुस्तमजी शाळा प्रशासनाने इयत्ता पहिलीतील 30 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले आहे.

मुंबई - दहिसर येथील रुस्तमजी शाळा प्रशासनाने इयत्ता पहिलीतील 30 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले आहे. शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनासोबत लढा दिल्याने ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी चौकशी सुरू केली आहे. 

शाळा दरवर्षी 10 टक्के शुल्कवाढ करत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. बालवाडीतून पहिलीमध्ये प्रवेश देण्यासाठी शाळेने सुमारे 38 टक्के शुल्कवाढ केली आहे. तसेच पालकांना 50 हजार रुपये अनामत रक्कम भरण्याची सक्ती केली आहे. याविरोधात पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. पालिका शिक्षणाधिकाऱ्यांनीही या संदर्भात शाळेला नोटीस पाठवली होती. यानंतरही शाळेने 30 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले. तसेच पालकांना शाळेत बोलवून शुल्क रोख भरा आणि प्रवेश पुन्हा निश्‍चित करा, असे सांगितल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याविरोधात सोमवारी काही पालकांनी पोलिसांत धाव घेतली आहे. 

शुल्कवाढ नियमानुसारच 
आम्ही नियमानुसार कार्यवाही करत असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शुल्क वाढ ही महाराष्ट्र शैक्षणिक संस्था कायदा, 2011नुसार पालक शिक्षक समितीसमोर मांडण्यात आली होती. यानंतर ती मंजूर करण्यात आली आहे. बैठकीत कोणत्याही पालकाने याला विरोध केला नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: 30 students were removed from the school in mumbai