नवी मुंबईकरांवर वृक्ष संकट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

तुर्भे - नवी मुंबईत तीन दिवसांत 30 झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने अनेक ठिकाणच्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली नसल्याने नवी मुंबईकरांवर आता वृक्ष संकट निर्माण झाले आहे. पालिकेने सध्या पाम बीच मार्गासह कोपरखैरणे, वाशी, ऐरोली व नेरूळ येथील झाडांची छाटणी सुरू केली आहे. पालिकेचा हा कारभार म्हणजे वरातीमागून घोडे असा आहे. वाशीतील जे एन वनमधील घरावर झाड कोसळून त्याचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे शहर, गावठाणे आणि एमआयडीसीत 30 हून अधिक झाडे कोसळली आहेत. 

नवी मुंबई शहरात 15 लाखांहून अधिक झाडे आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी त्यांच्या फाद्यांची छाटणी केली जाते. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची आधीच छाटणी केली जाते; मात्र या वेळी नवी मुंबईतील झाडांची छाटणी करण्यात दिरंगाई झाल्याने जून उजाडला तरी अनेक ठिकाणी झाडांची छाटणी सुरू झालेली नाही. यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने 2 जूनलाच हजेरी लावल्याने शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. 

कोपरखैरणे, ऐरोली, वाशी, नेरूळ आणि ठाणे-बेलापूर मार्गाशेजारच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी अद्याप सुरू झाली नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्‍यता आहे. वाढलेल्या फांद्यांमुळे वजन वाढल्याने तीन दिवसांत 30 पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या वाहिन्यांवर झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित होत आहे. एमआयडीसीतील झाडांची छाटणी झाली नसल्याने तेथे विजेच्या वायरवर झाडे व फांद्या कोसळून वीजपुरवठा खंडित होत आहे. पावणे एमआयडीसी व गावातील झाडे कोसळून तब्बल पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

Web Title: 30 trees collapsed in 3 days