समुद्र किनारी वाहून आला तब्बल 300 मेट्रीक टन कचरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार सुरुच होती. यंदाच्या वर्षातील पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती दुपारी 1.45 वाजता असल्याने सुरक्षितता म्हणून मुंबई महापालिकेने भरतीबाबतचे फलक किनाऱ्यांवर ठिकठिकाणी लावले होते.

मुंबई : समुद्राला आलेल्या भरतीमुळे मुंबईत तब्बल 300 मेट्रीक टन कचरा किनाऱ्यावर जमा झाला होता. अवघ्या चार तासात हा कचरा किनाऱ्यावर आला असल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते. मुंबई आणि परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यात समुद्राला येणारी भरती पाहता हा कचरा हटविण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विविध चौपाट्यांना कचराकुंड्याचे रुप आले आहे.

दुपारी पावणेदोनच्या सुमारास 4.90 मीटर उंचीची या वर्षातील सर्वात मोठी लाट समुद्रात उसळल्याने शेकडो मेट्रो टन कचरा समुद्र किनाऱ्यावर आला. त्यामुळे समुद्राच्या लाटा आणि पावसाची मजा लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या पर्यटक आणि मुंबईकरांची कचरा आणि घाणीमुळे निराशा झाली. 

पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार सुरुच होती. यंदाच्या वर्षातील पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती दुपारी 1.45 वाजता असल्याने सुरक्षितता म्हणून मुंबई महापालिकेने भरतीबाबतचे फलक किनाऱ्यांवर ठिकठिकाणी लावले होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास सर्वात मोठी लाट मुंबईच्या समुद्रात उसळल्याने मरिन ड्राईव्ह, गिरगाव, वरळी, दादर, जुहू, वर्सोवा आणि मढ या चौपाट्यांच्या किनार्यावर शेकडो मेट्रीक टन कचरा जमा झाला. त्यामुळे अल्पावधीतच चौपाट्या कचराडेपो बनल्या.

पावसाचा आणि लाटांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्यांना कचऱ्यातून वाट काढावी लागली. शनिवारी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 300 मेट्रिक टन कचरा महापालिकेने उचलल्याचे वरळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पालिका अधिकाऱ्याने सांगितले. सर्वाधिक कचरा मरिन ड्राईव्ह, दादर आणि जुहू चौपाटीवर गोळा केल्याची माहितीही त्यांनी दिली. हाई टाईडच्या धर्तीवर किनाऱ्यावरील कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने जादा मनुष्यबळ वापरल्याचेही त्यांनी सांगितले. समुद्रातील कचरा किनाऱ्यावर आल्याने, समुद्रकिनाऱ्यावरील कठड्यांवर बसणाऱ्या पर्यटकांची चांगलीच गैरसोय झाली होती. तर हायटाईड असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यांजवळ जाण्यास पालिकेचे अधिकारी आणि जीवरक्षक मनाई करत असल्याने, लोकांचा हिरमोड होत होता. 

दरवर्षी पावसाळ्यादरम्यान चौपाटीवर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. नागरिक जो कचरा समुद्रात टाकतात, तो कचरा भरतीनंतर किनाऱ्यावर जमा होतो. शहरामध्ये सर्वत्र टाकलेला कचरा विशेषत: प्लास्टिक कचरा, गटारामधून जाणारे प्लास्टिक समुद्रात येतो. आणि पावसाळ्यात निसर्ग त्याची कमाल दाखवितो. समुद्राला भरती आली, की हा कचरा लाटांमार्फत समुद्रकिनाऱ्यावर परत येतो. 
- जय शृंगारपुरे, दादर चौपाटी स्वच्छता प्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 metric tons of waste was carried out to the beach