डहाणू, तलासरीत 3.2 रिश्‍टर स्केल भूकंपाची नोंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पालघर परिसरात भूकंपाचे सत्र सुरूच

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्‍याला मंगळवारी (ता. 13) पहाटे 3.2 रिश्‍टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. गेल्या नऊ महिन्यांपासून या परिसरात हजारो सौम्य व मध्यम स्वरूपाचे हादरे बसत आहेत. या भूकंपाच्या धक्‍क्‍याने परिसरातील नागरिक भयभित झाले होते.

मंगळवारी पहाटेपासून भूकंपाचे एकापाठोपाठ तीन ते चार सौम्य धक्के बसले; मात्र यातील 5 वा. 38 मिनिटांनी 3.2 रिश्‍टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्‍क्‍याची नोंद भारतीय हवामान खात्यामार्फत देण्यात आली. हा भूकंपाचा धक्का तलासरी, डहाणू, धुंदलवाडी, दापचरी, वंकास, झाई, बोर्डी, उधवा तसेच गुजरात राज्याच्या उंबरगावपर्यंत बसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

वारंवार होणाऱ्या भूकंपाने अनेकांच्या घरांना तडे गेले असून काही भिंती दुभंगण्याच्या स्थितीत असल्याने अशा जमिनी हादरवून सोडणाऱ्या भूकंपाने डोक्‍यावरील छत आणि घर कोसळले तर जायचे तरी कुठे, असा प्रश्‍न नागरिक करीत आहेत. आतापर्यंत भूकंपाच्या धक्‍क्‍याने दोन जणांचे प्राणदेखील गेले आहेत.

भूकंपाची मालिका सुरूच 
डहाणू, तलासरी तालुक्‍यांत भूकंपाची मालिका सुरूच आहे. यापूर्वी 31 जुलै रोजी रात्री 8.20 वाजता मोठा धक्का बसला होता. दुसऱ्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी दुपारी 3.15 वाजता पुन्हा धक्का बसल्याने व त्याच काळात जोरदार पाऊस असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतरचे काही दिवस पाऊस आणि वाऱ्याचे तांडव झाल्याने येथील नागरिक हैराण झाले होते. अशातच मंगळवारी पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3.2 Richter scale earthquake reported in Dahanu, Talasaree