एसटी संप चिघळला 33 कोटींचे नुकसान; 'शिवशाही'लाही फटका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. विविध ठिकाणी सुरू असलेल्या असहकारामुळे एसटी सेवा दुसऱ्या दिवशीही कोलमडली होती.

मुंबई : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. विविध ठिकाणी सुरू असलेल्या असहकारामुळे एसटी सेवा दुसऱ्या दिवशीही कोलमडली होती. शनिवारी झालेल्या संपामुळे एसटीचा सुमारे 18 कोटींचा महसूल बुडाला. बुडालेल्या एकूण महसुलाचा आकडा 33 कोटींवर गेला आहे. 

विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीत "शिवशाही' बसचे 25 लाखांचे नुकसान झाले. संप मिटवण्यासाठी एसटी व्यवस्थापक व कर्मचारी संघटना यांच्यात बैठक सुरू असून, लवकरच यावर तोडगा निघेल अशी चिन्हे आहेत. 
एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांत प्रामुख्याने जाणवले. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 40 टक्के वाहतूक सुरू होती. संपाला हिंसक वळण लागले असून, राज्यात विविध ठिकाणी 19 शिवशाही बसवर दगडफेक केली. 

वेतनवाढीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांच्या वतीने सोशल मीडियाद्वारे संपाची हाक देत महामंडळाविरोधात एल्गार पुकारला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या अघोषित संपामुळे व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. एसटी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही सौम्य केली आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापनाची बैठक सुरू आहे. 

नियोजन कोलमडले 
- 250 आगारांतून 20 टक्के वाहतूक 
- राज्यातील 97 आगारे पूर्ण बंद 
- 151 आगारांत अंशतः वाहतूक 
- 25 आगारे सुरू 
- 25 हजार 840 फेऱ्या रद्द 
- 6308 फेऱ्या सुरळीत 

- संपकाळात 48 तासांत 19 "शिवशाही' बस फोडल्या 
- मुंबईत परळ, पनवेल आगारे पूर्ण बंद 
- सांगलीत "शिवशाही'वर, तर पुणदीफाटा येथे बसवर दगडफेक 
- रत्नागिरीत दोन "शिवशाही', तर दोन साध्या बस फोडल्या 
- भंडारा जिल्ह्यात चार बसची तोडफोड, गोंदियातही बसची मोडतोड 

- जळगाव जिल्ह्यातील यावल आगारातील 13 जणांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव 
- साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; एकही बस धावली नाही. दहिवडीत बसवर दगडफेक 

- साताऱ्यात पोलिस बंदोबस्तात खासगी निमआराम बसमधून प्रवाशांची वाहतूक 
- खासगी प्रवासी वाहतूकदारांचा नगर एसटी स्थानकाला गराडा 
- नाशिकला 4500 पैकी 550 फेऱ्या; नाशिक-धुळे मार्ग सुरळीत, पुणे, मुंबई मार्ग ठप्प 

Web Title: 33 crore loss to ST