मध्य रेल्वेच्या 18 रेल्वेस्थानकात 35 बॉटल क्रशर मशीन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

रेल्वेस्थानक आणि परिसरातील प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांकडून प्लास्टिक बाटल्यांचा वापरदेखील वाढत आहे. त्यावर मध्य रेल्वेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेस्थानक आणि परिसरातील प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून वापरण्यात आलेल्या बाटल्या स्थानकातच इतरत्र फेकण्यात येतात. या प्लास्टिक बाटल्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 18 रेल्वेस्थानकात एकूण 35 बॉटल क्रशर मशीन उभारण्यात येतील. तसेच सीएसएमटी स्थानकात प्लास्टिक बाटल्या जमा करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. सामाजिक दायित्व निधी अंतर्गत मेल एक्‍स्प्रेस फलाट क्रमांक 13-14 परिसरात ही मोठी प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन उभारण्यात आल्याचे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 2 ऑक्‍टोबर रोजी रेल्वेस्थानकात प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व रेल्वे मंडळाने दिले.

सध्या प्लास्टिक बॅग, प्लास्टिकची कटलरी, कप, चमचे याव्यतिरिक्त थर्माकोलची ताटे, खोटी फुले, बॅनर, झेंडे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट, मुंबई सेंट्रल या स्थानकात प्लास्टिक बॉटल क्रॅशर मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत; तर मध्य रेल्वेवर 35 प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन उभारण्यात येणार आहे. 

web title : 35 bottle crusher machines in 18 railway stations of Central Railway


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 bottle crusher machines in 18 railway stations of Central Railway