पस्तीस लाखांच्या नव्या नोटा, दोन किलो सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नवीन पनवेल : खांदेश्‍वर पोलिसांनी नवीन पनवेल परिसरातून रविवारी (ता. 25) पहाटे 35 लाखांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा आणि दोन किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

नवीन पनवेल : खांदेश्‍वर पोलिसांनी नवीन पनवेल परिसरातून रविवारी (ता. 25) पहाटे 35 लाखांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा आणि दोन किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

काही जण शनिवारी (ता. 24) रात्री 8 वाजता जुन्या-नव्या नोटा व सोने घेऊन नवीन पनवेल भागात येणार असल्याची माहिती खांदेश्‍वर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जयराज छापरिया यांनी नवीन पनवेल आणि आदई सर्कल येथे सापळा रचला. एक पांढरी कार रविवारी (ता. 25) पहाटे 1 वाजता ठरलेल्या ठिकाणी आली. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी ती थांबवली आणि तानाजी ईश्‍वर मेटकरे (वय 43), रघुनाथ भीमराव मोहिते (30), संतोष सर्जेराव पवार (30), सूर्यकांत जगन्नाथ कांडे (38), देवराम पुसाराम सोळंकी (32), खुमाराम कुलाराम चौधरी (38) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 34 लाख 98 हजारांच्या दोन हजारांच्या एक हजार 749 नव्या नोटा, 55 लाख 96 हजारांची दोन हजार 250 ग्रॅमची सोन्याची 22 बिस्किटे, असा 90 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आरोपींनी असमाधानकारक उत्तरे दिल्याने याबाबतची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे, असे वरिष्ठ निरीक्षक जयराज छापरिया यांनी सांगितले. ही रक्कम आणि सोने कुठून आणले, कुठे नेण्यात येणार होते? यामागे मोठे रॅकेट आहे का? याचा तपास सुरू आहे. 

दुसऱ्या दिवशीच कामगिरी 
खांदेश्‍वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयराज छापरिया यांची नियुक्ती होऊन केवळ दोन दिवस झाले आहेत. दोन दिवसांतच त्यांनी नवी मुंबई परिसरातील सर्वांत मोठी कामगिरी केल्याने यापूर्वी फारसे चर्चेत नसलेले खांदेश्‍वर पोलिस ठाणे चर्चेत आले आहे.

Web Title: 35 Lakhs in new notes and gold seized in Panvel