वाढत्या अपघातांमुळे नवी मुंबईत तब्बल 36 ठिकाणे धाेक्याची  

वाढत्या अपघातांमुळे नवी मुंबईत तब्बल 36 ठिकाणे धाेक्याची  

 नवी मुंबई : शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वारंवार अपघात होणाऱ्या (अपघाती प्रवण क्षेत्र) ठिकाणी महापालिका विशेष लक्ष देणार आहे. त्यासाठी अशी धोकादायक 36 ठिकाणे शोधण्यात आली आहेत. या ठिकाणी गतिरोधकासह रम्बलरसारख्या अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरातील अपघात प्रवण क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी दिल्ली इंन्टीग्रेटेड मल्डीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम यांच्या अहवालानुसार नगरविकास विभागातर्फे 2018 च्या परिपत्रकानुसार महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली "रस्ता सुरक्षा समिती' गठीत करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने पावले उचलली असून आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत अपघात प्रवण क्षेत्राच्या (ब्लॅक स्पॉट) ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी विविध उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. या समितीची विशेष बैठक नुकतीच झाली. या वेळी नवी मुंबईतील 36 अपघात प्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) या विषयी विस्तृत चर्चा झाली. 

वाहतूक पोलिस विभागाने निश्‍चित केलेल्या या "ब्लॅक स्पॉट'वर आवश्‍यक उपाययोजना तत्परतेने व कालबद्ध रितीने करण्याचे आदेश बांगर यांनी दिले आहेत. रस्ता सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन पोलिस विभागाने पाहणी करून व तपशील तपासून निश्‍चित केलेल्या 36 ब्लॅक स्पॉटवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात आले. यादृष्टीने नवी मुंबई महापालिका नागरी रस्ता सुरक्षा (परिक्षण) सुधारणा आराखडा (एनएमएमसी अर्बन रोड सेफ्टी ऑडिट) तयार करण्यासाठी मे. टंडन अर्बन सोल्युशन यांना नियुक्त सल्लागार केले आहे. त्यांच्यामार्फत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून तयार केलेल्या अहवालाचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. यादरम्यान पालिका परिसरातील 36 अपघात प्रवण क्षेत्रांचा आढावा घेण्यात आला. या सर्व क्षेत्रांचे तांत्रिकदृष्ट्या सर्वेक्षण करून त्या ठिकाणी सल्लागारांमार्फत सुचविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

कोणत्या उपाययोजना करणार 
नवी मुंबईतील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी महापालिकेतर्फे गतिरोधक, थांबा रेषा, थर्मोप्लास्ट पेंट, कॅटाईज ब्लिंकर्स, रम्बलर अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यात त्या क्षेत्राची भौगोलिक परिस्थिती व वाहतुकीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्या त्या क्षेत्राच्या गरजेनुसार रोलर क्रॅश बॅरिअर, पादचारी पूल, टेबल टॉप क्रॉसिंग, पथदिवे व्यवस्थेत वाढ अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. 
 
या ब्लॅक स्पॉटवर होणार तातडीने बदल 
36 ब्लॅक स्पॉटमधील तातडीने कार्यवाही करण्याची गरज असलेल्या अरेंजा कॉर्नर सिग्नल ते कोपरीगांव सिग्नल, मोराज सिग्नल ते एनआरआय सिग्नल, अन्नपूर्णा सर्कल ते माथाडी सर्कल सिग्नल, शीव-पनवेल महामार्गावरील सानपाडा जंक्‍शन अशा चार प्रमुख ब्लॅक स्पॉटमध्ये प्रामुख्याने त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत. 

(संपादन : नीलेश पाटील)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com