ठाण्यात 38 बालमजुरांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

ठाणे : मजुरीसाठी बिहारहून मुंबईच्या दिशेने आलेल्या 38 बालकामगारांची सुटका शनिवारी पालवी चाईल्ड लाईन व प्रथम सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी केली. यातील 18 मुलांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले, तर उर्वरित 20 मुलांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. 

रक्‍सोल-मुंबई जनसाधारण एक्‍स्प्रेसने उत्तर प्रदेश, बिहार येथील मुले मजुरीसाठी मुंबईत आणली जातात. बिहार येथून 58 मुलांना मुंबईत आणले जात असल्याची माहिती काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पालवी चाईल्ड लाईन संस्था व प्रथम सामाजिक संस्थेला मिळाली होती. जनसाधारण एक्‍स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला या स्थानकावर थांबते; परंतु अनेकदा ही एक्‍स्प्रेस कल्याण अथवा ठाणे स्थानकातच रद्द करण्यात येते. त्यामुळे पालवी चाईल्ड लाईन व प्रथम सामाजिक संस्थेचे 42 कार्यकर्ते शुक्रवारी रात्रीच कल्याण स्थानकात दाखल झाले.

कल्याण स्थानकातून गाडी पकडून त्यांनी गाडीतील मजूर मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ठाणे स्थानकात गाडी रद्द करण्यात आली. त्या वेळी कार्यकर्त्यांनी 38 मुलांना ताब्यात घेतले. या मुलांना ठाणे रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 18 मुलांची ओळख पटल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले, तर 20 मुलांना भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याची माहिती पालवी चाईल्ड लाईन संस्थेच्या वैशाली जाधव यांनी दिली. 

गुन्हा दाखल नाही... 

बिहारच्या मोतिहारी, सीतामढी, गया या भागातून मोठ्या संख्येने बालमजुरीसाठी मुले मुंबईत येतात. या प्रकरणी शनिवारी दुपारपर्यंत ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: 38 child labor released in Thane