भूमिगत थ्रीडी मत्स्यालय बासनात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

पेंग्विनचा मृत्यू आणि कंपन्यांतील वादामुळे पालिकेचा निर्णय
मुंबई - भायखळा येथील राणीच्या बागेत बांधण्यात येणारे देशातील पहिले भूमिगत थ्रीडी मत्स्यालय स्वप्नच ठरण्याची शक्‍यता आहे. पेंग्विनच्या मृत्यूचा धक्का आणि या मत्स्यालयाचा आराखडा तयार केलेल्या कंपन्यांच्या भागीदारीतील तिढा, यामुळे महापालिकेने हा प्रकल्प सध्या बासनात ठेवला आहे. महापालिका 25 कोटींचा खर्च करून जगातील सहावे भूमिगत मत्स्यालय बांधणार होती.

भायखळा येथील प्राणिसंग्रहालय नव्याने उभारण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आले होते. परदेशातील अनेक पशुपक्षी भारतात आणण्यात येणार होते. भूमिगत थ्रीडी मत्स्यालय बांधण्याचा निर्णयही मार्चमध्ये घेण्यात आला होता. जमिनीच्या आठ मीटरखाली 20 मीटर काचेच्या भुयारात जगभरातील सुमारे 450 मत्स्यजीव पाहता येणार होते. जगात अशा प्रकारची पाच मत्स्यालये आहेत. भारतातील हे अशा प्रकारचे पहिले मत्स्यालय ठरणार होते.

पेंग्विनसाठी निवारा बांधणाऱ्या हायवे कन्स्ट्रक्‍शन कंपनीने या मत्स्यालयाचा आराखडा तयार केला होता. त्याला प्रशासकीय मंजुरीही मिळाली होती; मात्र आता अमेरिकेतील सीवॅट कंपनीने हायवे कन्स्ट्रक्‍शन कंपनीबरोबर भागीदारी नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हायवे कन्स्ट्रक्‍शनला हे मत्स्यालय बांधण्याचे काम देण्यास सध्या महापालिका तयार नाही. पेंग्विनच्या मृत्यूमुळे हे मत्स्यालय बांधण्याचा निर्णय पालिकेने तूर्तास पुढे ढकलला असला, तरी भविष्यात तो गुंडाळला जाण्याचीही शक्‍यता आहे. सध्या हा प्रकल्प स्थगित केला असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

आतापर्यंत रद्द झालेले प्रकल्प
चित्ता कॅफे - काचेच्या पिंजऱ्यात "कॉफी हाऊस' करून त्याच्या बाजूला चित्त्याचा मुक्तसंचार ठेवण्यात येणार होता. हा "चित्ता कॅफे' पालिकेने 2008 मध्ये तयार केलेल्या राणीच्या बागेच्या आराखड्यात समाविष्ट होता; मात्र नंतर खर्चात कपात करण्यासाठी हा प्रकल्प रद्द करण्यात आला.
फाइव्ह डी थिएटर ः प्राणी, पक्षी, समुद्री जीव याबाबत माहिती करून देणारे फाइव्ह डी थिएटर बांधण्यात येणार होते. तेही नंतर रद्द करण्यात आले.

Web Title: 3d underground aquarium