डॉ. पायल आत्महत्या : नायर रुग्णालयात रॅगिंग नेहमीचेच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येपूर्वी देखील रुग्णालय प्रशासनाकडे चार रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येपूर्वी देखील रुग्णालय प्रशासनाकडे चार रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने थातुरमातुर कारवाई करत ही प्रकरण निकालात काढली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडे मागितली होती.रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात रॅगिंगच्या चार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.2014 रोजी बॅचलर ऑफ मेडिसिन,बॅचलर ऑफ सर्जरी या विभागातील दोन विद्यार्थ्यांनी दुसऱ्या वर्षाच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांविरोधात रुग्णालय प्रशासन आणि  रॅगिंग विरोधात कमिटीकडे तक्रारी केल्या होत्या.2015 मध्ये मायक्रोबायोलॉजीतील दोन निवासी डॉक्टर यांनी रॅगिंग विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या तर 2015 मध्येच दुसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या फिजिओलॉजी डॉक्टर कडून आणखी एक तक्रार दाखल झाली होती.2018 मध्ये ही रुग्णालय प्रशासनाला आणखी एक रॅगिंगच्या तक्रार प्राप्त झाली होती.यासर्व तक्रारी टोल फ्री क्रमांकावरून करण्यात आल्या होत्या.

नायर रुग्णालयातील अहवालानुसार सन 2013 पासून रॅगिंग विरोधी समितीच्या एकूण 21 बैठका पार पडल्या आहेत.एका प्रकरणात समितीने केवळ एका विद्यार्थ्यांशी निव्वळ चर्चा केल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे.तर रॅगिंग प्रकरणी समितीने आता पर्यंत दोन विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याच समितीचं म्हणणं आहे.रॅगिंगच्या तक्रारी विरोधात रॅगिंग विरोधी समितीने गांभीर्याने चौकशी करून वेळीच कारवाई केली असती तर कदाचित डॉ.पायल तडवी यांचा नाहक बळी गेला नसता अशी भावना आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 complaints are filed before Dr Payal commits suicide in Nayar Hospital