पूल कोसळल्याप्रकरणी चार अभियंते निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी चार अभियंत्यांना आज निलंबित करण्यात आले; तसेच मुंबईत २९६ पुलांचे पुन्हा स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार आहे; तसेच स्ट्रक्‍चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे; तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

गुरुवारी (ता. १४) सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले; तर ३१ जण जखमी झाले होते. पूल दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता एस. ओ. कोरी, ए. आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर. बी. तारे आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते यांना निलंबित करण्यात आले. या दुर्घटनेप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांविरोधात आझाद मैदान पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्घटनेप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर २२ मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची, यावरून महापालिका आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी सुरू होती; पण अखेर महापालिकेने हा पूल आमचाच असल्याचे मान्य केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासातही हा पूल पूर्णपणे पालिकेचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्‌विटरवरून कारवाई होणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर लगेच काही क्षणांमध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी कालच या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: 4 Engineer Suspend by Bridge Collapse Crime