केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईत 40 टन खाद्यपदार्थ जमा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

एकटा माणूस काहीही शकत नाही, असा विचार करून आपण बहुतेक वेळा गप्प बसतो. मात्र सांताक्रूझच्या रिंकू राठोड यांनी केरळच्या आपदग्रस्तांसाठी मदत करायची असे एकट्याने ठरवून मित्रांपासून सुरुवात केली आणि आज अर्ध्या दिवसात त्यांना केरळच्या पूरग्रस्तांसाठी 40 टन खाद्यपदार्थ मिळाले.

मुंबई- एकटा माणूस काहीही शकत नाही, असा विचार करून आपण बहुतेक वेळा गप्प बसतो. मात्र सांताक्रूझच्या रिंकू राठोड यांनी केरळच्या आपदग्रस्तांसाठी मदत करायची असे एकट्याने ठरवून मित्रांपासून सुरुवात केली आणि आज अर्ध्या दिवसात त्यांना केरळच्या पूरग्रस्तांसाठी 40 टन खाद्यपदार्थ मिळाले.

राठोड व त्यांच्या मित्रांच्या फूड आर्मीने रविवार व सोमवार या दोन दिवसांत 30-40 टन खाद्यपदार्थ मिळवायचे असे ध्येय ठेवले होते. मात्र रविवार दुपारपर्यंतच त्यांच्या मुंबईतील मदत केंद्रांवर खाद्यपदार्थांचा एवढा पाऊस पडला की त्यांना ती केंद्रे बंद करावी लागली. आता उद्या हे सगळे अन्नधान्य व खाद्यपदार्थ व्यवस्थित लावून पॅकिंग करून एकत्र केले जातील आणि मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी केरळला रवाना होतील.

केरळमधील नागरिकांना ठेपले आवडणार नाहीत हे जाणून त्यांनी रेडी टू इट कोरडा सांजा तूरडाळ, तांदूळ, साखर, दूधभुकटी असा शिधा लोकांकडून मागवला. हा निरोप समाज माध्यमांवरून फिरला व त्यांच्या 47 मदतकेंद्रांवर मदतीचा पाऊस पडला. आता हा साठा देखील जेट एअरवेजमार्फत बंगळूरला जाईल व तेथील यूथ फॉर सेवा या संघटनेमार्फत म्हैसूर व केरळमधील वायनाड येथे पाठवला जाईल. राठोड यांच्या या फूड आर्मी संघटनेत कोणतेही सदस्यत्व शुल्क नाही वा ते कसलीही देणगी घेत नाहीत. केवळ मानवता धर्माला जागून अडलेल्यांची सेवा करायची याच ध्येयाने या संघटनेचे सदस्य आपला खारीचा वाटा उचलीत आहेत.

Web Title: 40 tons of food deposits in Mumbai for the help of Kerala