बेस्टचा प्रवास होणार गारेगार 

बेस्टचा प्रवास होणार गारेगार 

मुंबई -  महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असून, जीवनावश्‍यक वस्तू आणि प्रवास महाग झाला आहे. या परिस्थितीत मंगळवारपासून बेस्ट बसचे किमान भाडे पाच रुपये झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन बेस्टच्या ताफ्यात 400 वातानुकूलित मिनी बस लवकरच दाखल होणार आहेत. नव्या बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यामुळे मुंबईकरांना गारेगार बसप्रवासाचा आनंद घेता येईल. 

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 3300 बसगाड्या आहेत. त्यापैकी 2900 बस रस्त्यांवर धावतात. तथापि, ठिकठिकाणच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना बस थांब्यांवर ताटकळावे लागते. बसची वाट पाहून कंटाळलेले प्रवासी टॅक्‍सी, रिक्षा, ओला-उबेरचा आधार घेतात, तर काही जण शेअर रिक्षाकडे वळतात. त्यामुळे काही वर्षांत बेस्टच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. प्रवासी पुन्हा बेस्टकडे आकर्षित व्हावेत म्हणून प्रशासनाने भाड्यात कपात केली आहे. त्यानुसार मंगळवारपासून किमान भाडे पाच रुपये झाल्यामुळे प्रवासी खूश झाले. बेस्टचा बसचा ताफाही 6000 पर्यंत नेण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यात 400 एसी मिनी बस दाखल होणार आहेत. ऑगस्टपर्यंत 200 एसी मिनी बस आणि नोव्हेंबरपर्यंत उर्वरित बसगाड्या घेण्यात येतील, अशी माहिती उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली. 

अँटोनी गॅरेजेस आणि श्री कृपा सर्व्हिसेस यांना हे कंत्राट देण्यात आले असून, त्यासाठी सुमारे 587 रुपये खर्च येणार आहे. सुरुवातीला 200 एसी मिनी बस, 200 साध्या मिनी बस आणि 50 साध्या मिडी बस खरेदी करण्याचा प्रस्ताव होता; परंतु एसी आणि साध्या बसच्या तिकीटदरांत पहिल्या पाच किलोमीटरसाठी विशेष फरक नाही. त्यामुळे 450 बस खरेदी करण्याऐवजी 400 एसी बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या सभेत एकमताने मंजुरी मिळाली. बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याबाबत मान्यताप्राप्त संघटना आणि मुंबई महापालिका यांच्यात करार झाला. त्यानंतर महालिकेने या बसगाड्यांसाठी अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला. भाजपचे सुनील गणाचार्य, कॉंग्रेसचे रवी राजा आदींनी करारातील त्रुटींवर बोट ठेवले. कंत्राटदाराला सूट देऊन प्रशासन झुकल्याचा आरोप त्यांनी केला. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बेस्ट उपक्रमाचा तोटा कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले. 

वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यास परवानगी मिळाली असून, न्यायालयानेही संमती दिली आहे. त्यामुळे 400 एसी बसगाड्या लवकरच बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. एमएमआरडीएने दिलेल्या वातानुकूलित बस वांद्रे-कुर्ल्यात चालवल्या जात आहेत. नोव्हेंबरपर्यंत सर्व बसगाड्या दाखल होतील. 
- डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक,बेस्ट उपक्रम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com