परताव्याच्या आमिषाने साडेतीन कोटींचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

मुंबईतील 41 गुंतवणूकदारांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील कंपनी व संचालकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई -गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली मुंबईतील 41 गुंतवणूकदारांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील कंपनी व संचालकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीने सात योजनांत प्रत्येक महिन्याला साडेपाच टक्के व्याज देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र गेल्या वर्षापासून गुंतवणूकदारांना व्याज मिळालेच नाही. 

कमल बुलचंदानी (72) यांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधील कंपनीचे संचालक व इतर अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. नोव्हेंबर 2016 मध्ये बुलचंदानी यांनी एका वित्तीय सल्लागाराच्या सांगण्यावरून या कंपनीच्या एका संचालकाची अंधेरीतील कार्यालयात भेट घेतली होती. बुलचंदानी यांनी कंपनीतील योजनांमध्ये 24 लाख रुपये गुंतवले होते. त्यांना डिसेंबर 2016 ते नोव्हेंबर 2017 पर्यंत व्याज मिळाले. त्यानंतर मात्र व्याज मिळणे बंद झाले. त्यानंतर या कंपनीची अंधेरीतील शाखाही बंद झाल्यानंतर बुलचंदानी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 41 investors cheated of Rs 3.5 crore in mumbai