
Mumbai News : मालमत्ता कराची आतापर्यंत ४,५०० कोटींची वसुली
मुंबई : मुंबई महापालिकेला उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मालमत्ता कर आहे. एप्रिल २०२२ ते ८ मार्च २०२३ पर्यंत ४,५०० रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीचा ६ कोटींचा टप्पा पार करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा राहणार आहे.
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद झाल्यानंतर आता मालमत्ता कर हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. मात्र ५०० चौरस फुटांखालील घरांना कर माफी दिल्याने पालिकेला कोट्य़वधी रुपय़ांचा तोटा सहन करावा लागला आहे. कर माफी दिल्याने मुंबई महापालिकेला वर्षाला ४६४ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे उर्वरित मालमत्ता धारकांकडून वर्षांला सहा हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत मालमत्ता कर वसुलीचा सहा हजार कोटींचा टप्पा गाठला होता. मात्र यंदा मार्च अखेरपर्यंत सहा हजार कोटींचा टप्पा पार करण्याचे उद्दीष्ट असून ते पूर्ण होईल. मुंबईत साडेतीन लाख मालमत्ता असून या मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर वसूल करण्यात येतो.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवर होणारा खर्च पहाता मालमत्ता कर वसूल करण्यात येतो. यंदा ८ मार्चपर्यंत ४,५०० कोटी रुपये मालमत्ता कर रुपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून उर्वरित १,५०० कोटी रुपये मार्च अखेरपर्यंत जमा होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.