कॉंग्रेसही घेणार 48 मतदारसंघांचा आढावा

कॉंग्रेसही घेणार 48 मतदारसंघांचा आढावा

मुंबई- लोकसभा निवडणुकीतील आघाडीसाठी "फिफ्टी-फिफ्टी'च्या सूत्राचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कॉंग्रेसने दबाव वाढवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ कॉंग्रेसनेही राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दबाव टाकल्याचे मानले जाते.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपविरोधी राजकीय पक्षांची महाआघाडी उभारण्यात कॉंग्रेसने पुढाकार घेतला आहे. भाजपच्या विरोधातील मतांचे विभाजन टाळले, तर भाजपचा पराभव शक्‍य असल्याचे उत्तर प्रदेश, कर्नाटकांतील पोटनिवडणुकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रत्येक समविचारी पक्षाला सोबत घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे.

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांच्या जागावाटपाबाबत सध्या दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागावाटपासाठी 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आधार घेतला आहे. लोकसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार, तर कॉंग्रेसच्या अवघ्या दोन जागा निवडून आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फक्त एका जागेचे अंतर होते. कॉंग्रेसचे 42, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 41 आमदार निवडून आले होते. त्यामुळे आघाडी करताना राष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे लोकसभेच्या 24 जागांचा आग्रह धरला आहे. मात्र, कॉंग्रेसला ही मागणी मान्य नाही.

आगामी निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष यांच्यासोबत कॉंग्रेसची आघाडी जवळपास नक्की आहे. छोट्या पक्षांकडून जागांची मागणी आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला जागा सोडणे शक्‍य नाही. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने 26, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 22 जागा लढवल्या होत्या. त्यामुळे या वेळीही '26:22' हे जागावाटपाचे सूत्र राहील, अशी माहिती कॉंग्रेसच्या एका नेत्याने दिली. राज्यातील कॉंग्रेसचे नेते निम्म्या जागांची मागणी मान्य करीत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे "फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला मांडल्याचे समजते.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान राज्यातील लोकसभा मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा घेताना आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर मित्रपक्षांना कोणत्या जागा सोडणे शक्‍य आहे, याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे समजते.

कॉंग्रेसच्या बैठकांचे सत्र 
15 नोव्हेंबर ः मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्र 
16 नोव्हेंबर ः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र 
17 नोव्हेंबर ः कोकण विभाग 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com