जादा वीज बिलांच्या तब्बल 48 हजार तक्रारी; तब्बल 'इतक्या ग्राहकांचे बिल अजूनही येणे बाकी..  

electric meter
electric meter

मुंबई: जादा बिलांच्या सुमारे 48 हजार तक्रारी आल्या, आता त्यातील जेमतेम दोन हजार तक्रारींची पहाणी शिल्लक आहे. उरलेल्या ग्राहकांनी बिलांच्या रकमा देण्यास सुरुवात केली असली तरी अद्याप सुमारे साडेसात लाख ग्राहकांनी 750 कोटी रुपयांची बिले दिली नाहीत. आम्ही त्यांना नऊ टक्के व्याजाने तीन किंवा जास्त महिन्यांचा कालावधी त्यासाठी देऊ शकतो, अशी माहिती अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज येथे दिली. 

जादा वीजबिले आल्यासंदर्भात लोकांच्या तक्रारींबाबत अदाणी चे मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल, मुख्य संचालन अधिकारी कपिल शर्मा यांनी दूरध्वनीद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशांनुसार हिवाळ्यातील तीन महिन्यांच्या सरासरीनुसार मार्च पर्यंत बिले दिली. मात्र एप्रिल मे मध्ये ग्राहक घरीच होते व उन्हाळ्यात जास्त वापरामुळे जास्त बिले आली. प्रत्यक्ष मीटररीडिंग नुसार ती जास्त असल्यामुळे ग्राहक भांबावले, असेही यावेळी सांगण्यात आले. 

सन 2019 च्या उन्हाळ्याच्या तुलनेत यावर्षीच्या उन्हाळ्यात मुंबईत विजेचा वापर व बिलांच्या रकमेत सरासरी पन्नास टक्के वाढ झाली आहे. मार्च-एप्रिल महिन्यात बिलांची थकबाकी 225 कोटी रुपये होती. ती जूनपर्यंत 830 कोटी रुपयांपर्यंत वाढली होती. आता लोकांनी बिले द्यायला सुरुवात केली असली तरीही अद्याप 750 कोटी रुपयांची बिले लोकांनी दिली नाहीत. 

आतापर्यंत शहरातील कंटेनमेंट झोन वगळता पंचवीस लाख ग्राहकांपैकी सुमारे 94 टक्के ग्राहकांचे प्रत्यक्ष मीटररीडिंग झाले आहे. या गोंधळामुळे मार्च अखेरपर्यंत अडीच लाख ग्राहकांनी बिले भरली नव्हती, जून मध्ये ही एकूण संख्या दहा लाखांपर्यंत केली. आता केवळ साडेसात लाख ग्राहकांनी बिले भरणे बाकी आहे. मात्र सध्या आम्ही कोणाचीही वीज तोडणार नाही. उलट कोणाला गरज असेल तर बिले भरण्यासाठी वेळ देऊ, पण त्यावर राज्य वीज नियामक आयोगाच्या नियमांनुसार नऊ टक्के व्याज आकारले जाईल, असे पटेल यांनी सांगितले. 

सध्या आमच्या आठ कस्टमर केअर केंद्रात प्रत्येकी 20 ते 25 अधिकारी असून ग्राहकांचा त्यांच्याशी थेट संपर्क येऊ नये म्हणून तक्रार निवारणासाठी त्यांच्याशी व्हिडियो कॉन्फरन्सने बोलायची सोय केली आहे. यापुढचा टप्पा म्हणजे ग्राहकांना आधीच वेळ घेऊन घरबसल्या केंद्रातील अधिकाऱ्यांशी तक्रारीबाबत व्हिडियो कॉलवरून बोलता येईल. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष मीटररीडिंग घ्यावे लागू नये, यासाठी पाच वर्षांत सर्व म्हणजे 25 लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात येतील. पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत सात लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जातील, असेही शर्मा म्हणाले. 

अभिनेत्यांचे शब्द अवमानकारक:

अदाणीचे मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 25 लाख ग्राहक असल्याने त्याप्रमाणात ग्राहकांच्या तक्रारीही जास्त आल्या. मात्र अर्शद वारसी सारख्या सेलिब्रिटी ग्राहकाने ट्वीट करून वापरलेली भाषा अवमानकारक होती. त्यामुळे आम्ही त्याला ते शब्द काढायला सांगितले. नंतर मात्र आपल्याला बिल कसे आकारले ते कळल्याचे त्याने म्हटल्याचेही सांगण्यात आले.

48 thousand complaints for increased electricity bills

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com