जेएसडब्ल्यूला साडेपाच कोटींचा दंड

जेएसडब्ल्यूला साडेपाच कोटींचा दंड

अलिबाग : डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने शहाबाज येथील रस्त्यालगतच्या एकूण १० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये कंपनीतून निघणाऱ्या मातीचा (राखेचा स्लॅक) भराव विना परवाना केला होता. याप्रकरणी अलिबागचे उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी कंपनीला तब्बल ५ कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार ही बाब उघड झाली आहे. सावंत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मौजे शहाबाज येथील शेतकरी प्रशांत मधुसूदन नाईक, रवींद्र पाटील, संध्या पाटील, सचिन जैन, हरिश्‍चंद्र घासे, प्रभाकर तुकाराम पाटील, लीलाबाई दत्तात्रेय पाटील, शशीकांत श्रीपत पाटील, मधुकर सीताराम पाटील आणि सायली सुधीर कळबास्कर यांच्या मौजे शहाबाज येथील रस्त्यालगतच्या शेतजमिनीमध्ये जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने कंपनीतून निघणाऱ्या मातीचा भराव विना परवाना केला आहे. या शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आणि तलाठी सजा शहाबाज यांच्या अहवालानुसार प्रांत कार्यालयामध्ये ३० मार्च रोजी सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी जेएसडब्ल्यूचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने त्यानंतरची सुनावणी ९ एप्रिलला लावण्यात आली. 

सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रति ब्रास ४९८ रुपये इतकी आहे. मातीच्या उत्खननाच्या दंडाची रक्कम बाजारमूल्याच्या पाच पट म्हणजेच प्रति ब्रास रुपये २४९० अशा प्रकारे लावली आहे. जेएसडब्ल्यूने विनापरवाना केलेल्या एकूण २१ हजार ५८७ ब्रास गुणीले २४९० अशी एकूण ५ कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला बजावले आहे. त्याची प्रत माहिती अधिकारामध्ये सावंत यांना  प्राप्त झाली आहे.

कंपनी प्रशासनाला म्हणणे मांडण्यासाठी दिली वेळ 
जेएसडब्ल्यू कंपनीने केलेल्या भरावाने शेतकऱ्यांच्या शेतीतून पाणी जाण्याचा नैसर्गिक मार्ग अडवण्यात आला होता. या संदर्भात येथील शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाकडे तक्रार केली होती. हा भराव मातीचा नसून कंपनीत तयार होणाऱ्या वेस्टेजचा होता. अशा प्रकारचा वेस्टेज कोणाच्याही जमिनीमध्ये उघड्यावर टाकता येतो का, याची परवानगी घेतली होती का? अशी विचारणा अलिबाग विभागीय कार्यालयाने केली होती. यातील काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कंपनीला देता आलेली आहेत, तर उर्वरीत प्रश्नांबद्दल म्हणणे मांडण्याची दोन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. 

जेएसडब्ल्यू कंपनीला ठोठावलेला दंड नियमाला धरून आहे. यासंदर्भातील एक प्रकरण सुनावणीसाठी आले होते. त्यानुसार कंपनीला दंडाची नोटीस काढण्यात आलेली आहे. टाकलेला भराव हा मातीचा नाही, तर वेस्ट मटेरियलचा आहे, असे कंपनीचे म्हणणे होते; मात्र तपासात हा भराव मातीचा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा निकाल दोन दिवसांत लागणार आहे. 
- शारदा पोवार, विभागीय अधिकारी, अलिबाग

या प्रकाराला सर्वच अधिकारी जबाबदार आहेत. परिसरातील प्रदूषण आणि पर्यावरणाची कोणालाही चिंता नाही. शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय आहे. राखेच्या प्रदूषणामुळे शेती करणे आता शक्‍य होत नाही, शेतकरी कर्जबाजारी होत आहे. जलस्रोत प्रदूषित झाल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. कंपनीविरोधात यापुढे थेट फौजदारी गुन्हेच दाखल करणे गरजेचे आहे.
- द्वारकानाथ पाटील, शहाबाज ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com