मुंबईत मुसळधार पावसाचे पाच बळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

उघड्या चेंबरमुळे मृत्यू
नालासोपारा - घरासमोर खेळणारा अबूबकर जफर अली (वय ६, रा. नालासोपारा) पावसाच्या पाण्यात वाहत जात उघड्या चेंबरमध्ये पडला. यात त्याचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका नाल्यात त्याचा मृतदेह सापडला.

मुंबई - महामुंबईत तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाच जणांचा बळी गेला असून, एक तरुण बेपत्ता झाला. मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलासह दोन सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विजयेंद्र सरदार बगडी (३६) आणि जगदीश बद्धा परमार्थ (५४) अशी बुधवारी (ता. ४) भरपावसात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या सफाई कामगारांची नावे आहेत. गोरेगावमधील सिद्धार्थ रुग्णालयाजवळ काम करत असताना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्यामुळे जगदीश परमार्थ खाली कोसळले. नागरिकांनी त्यांना जवळच्या कपाडिया रुग्णालयात नेले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. गोरेगावमध्येच पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना विजयेंद्र बगडी यांना नागरिकांनी बाहेर काढून कांदिवलीतील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. परंतु त्यांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

मोहम्मद शाहरुख शकिफ शेख (२४) युवक गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास वांद्रे-कुर्ला संकुलानजीक भारत नगर येथील खाडीत पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढून शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले; मात्र रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्याशिवाय मध्यरात्री १२.२५ च्या सुमारास हिंदमाता येथे सेंट पॉल शाळेच्या परिसरात साचलेल्या पाण्यात अशोक दत्ताराम मयेकर (६०) मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह केईएम रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या दोन्ही प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिठी नदीत मुलगा बुडाला 
मुसळधार पाऊस सुरू असताना बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कलानगर खाडी, धारावी टी जंक्‍शन येथे मिठी नदीत चार मुलांनी पोहण्यासाठी उड्या मारल्या. त्यापैकी तीन मुले सुखरूप बाहेर आली; मात्र अग्निशमन दलाने शोध घेऊनही एका मुलाचा थांगपत्ता लागला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 death by heavy rain in mumbai