विवाह संकेतस्थळावरुन तरुणीची फसवणूक 

विवाह संकेतस्थळावरुन तरुणीची फसवणूक 

मुंबई : विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या एका तरुणाने तरुणीची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या भामट्याला अटक करून अधिक तपास सुरू केला आहे, असे साकीनाका पोलिसांनी सांगितले. 

आदर्श प्रशांत म्हात्रे (30) असे अटक तरुणाचे नाव आहे. विरार येथे कुटुंबीयांसमवेत राहणारी 29 वर्षांची तरुणी साकीनाका परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करते. काही महिन्यांपूर्वी तिने एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर स्वतःचे प्रोफाईल टाकले. ही माहिती पाहून आदर्श म्हात्रे याने तिला विवाहासाठी विनंती पाठवली. त्यानंतर या दोघांमध्ये तीनचार वेळा मोबाईलवरून संभाषण झाले. 

आपण अभियंता असून सार्वजनिक बांधकाम विभागात कामाला असल्याचे आणि सध्या पनवेलला वास्तव्य असल्याचे त्याने या तरुणीला सांगितले. काही दिवसांत त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यानंतर त्याने आपल्या भाच्याच्या उपचारासाठी तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. एवढी रक्कम नसल्यामुळे तिने बॅंकेतून कर्ज काढून त्याला पाच लाख रुपये दिले. 

त्याने ही रक्कम स्वत:च्या बॅंक खात्यात जमा केली. त्यानंतर त्याने आणखी एक लाख रुपये मागितले; मात्र तिने नकार दिला. त्यावरून त्यांच्यात वाद होऊ लागले. तो सतत चिडचीड करून तिला शिवीगाळ करू लागला. त्यामुळे तिने आपले पाच लाख रुपये परत मागितले, परंतु त्याने ही रक्कम दिली नाही. त्यानंतर तिने साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या भामट्याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

web title : 5 lakh fraud on a young woman from a wedding site


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com