50 हजार मुलांना टायफॉईडचे सुरक्षा कवच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

नवी मुंबई - महापालिका व जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या टायफॉईड कंज्युगेट लसीकरणाने अवघ्या पाच दिवसांत तब्बल 50 हजारांचा आकडा गाठला आहे. मागील आठवड्यात दोन दिवस व या आठवड्यात तीन दिवस असे एकूण पाच दिवसांत शहरात विविध ठिकाणी महापालिकेतर्फे मुलांना लसीकरण करण्यात आले आहे. 

नवी मुंबई - महापालिका व जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या टायफॉईड कंज्युगेट लसीकरणाने अवघ्या पाच दिवसांत तब्बल 50 हजारांचा आकडा गाठला आहे. मागील आठवड्यात दोन दिवस व या आठवड्यात तीन दिवस असे एकूण पाच दिवसांत शहरात विविध ठिकाणी महापालिकेतर्फे मुलांना लसीकरण करण्यात आले आहे. 

शहरात 11 नागरी आरोग्य केंद्रांसहित खासगी रहिवासी सोसायट्यांची कार्यालये, रुग्णालये, बस डेपो या ठिकाणी लसीकरण बुथचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 14 जुलैला महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते शिरवणे नागरी आरोग्य केंद्रापासून या लसीकरणाला सुरुवात झाली. 14 व 15 जुलै अशा दोन दिवसांत 20 हजार 838 मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला होता. यानंतर आता 21, 22, व 23 जुलै अशा सलग आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये राबवलेल्या लसीकरण शिबिरामध्ये तब्बल 28 हजार 274 मुलांना लसीकरण करण्यात आले. नेरूळ सेक्‍टर 48, नेरूळ फेज-1, शिरवणे, तुर्भे, इंदिरानगर, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, चिंचपाडा व दिघा अशा एकूण 11 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण शिबिर राबवण्यात आले. कोपरखैरणेतील सिटी हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या लसीकरण शिबिराला महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली. नवी मुंबई शहरात टायफॉईड आजाराचे रुग्ण कमी असले, तरी वातावरण व बदलत्या जीवनशैलीमुळे टायफॉईड होऊ शकतो. त्यामुळे 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना हे लसीकरण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. हे लसीकरण मागील पाच वर्षांपासून खासगी बालरोगतज्ज्ञांकडून त्यांच्या रुग्णांना दिले जात आहे; मात्र ते महाग असल्यामुळे सरकारी आरोग्य केंद्रांवर उपलब्ध केले जात नव्हते; परंतु यात जागतिक आरोग्य संघटनेने विशेष मोहीम सुरू केल्यामुळे ही लस महापालिकेला माफक दरात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शहरात तब्बल चार लाख कंज्युगेट लसीकरण करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला. यापुढील लसीकरण शिबिर 28 व 29 जुलैला विविध ठिकाणी राबवण्यात येणार आहे.

Web Title: 50 thousand children tayaphoidace protection