मोठ्या घराचे आमिष दाखवून महिलेला ५१ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

या प्रकरणात विलेपार्ले पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली असून दोनजण अद्यापही फरार आहेत

अंधेरी : मोठ्या घराचे कागदपत्र दाखवून एका महिलेला ५१ लाखांचा गंडा घालणाऱ्या चौघांच्या विरोधात विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी संगम पवार याला सोमवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या परिणिता सावंत हिची जामिनावर सुटका करण्यात आली असून, अन्य दोघे फरार आहेत.

ममता विकास पटेल या दोन मुली आणि सासूसह विलेपार्ले येथील प्रार्थना समाज मार्गावरील एका इमारतीत राहतात. मोठ्या घराच्या शोधात असलेल्या ममता यांची परिणिता सावंत, संगम पवार, सुरेश गायकवाड, देविदास जाधव यांच्याशी ओळख झाली. या चौघांनी ममता यांना बोरिवली पूर्वेकडील गणेशनगर येथील दोन लगतच्या सदनिका दाखवल्या. बनावट कागदपत्रे तयार करून या सदनिका ममता यांना विकल्याचा बनाव रचून ५१ लाख रुपये उकळले.

या प्रकरणी पोलिसांनी पूर्वीच अटक केलेल्या परिणिता सावंत हिची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. पोलिसांनी सोमवारी संगम पवार याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सुरेश गायकवाड आणि देविदास जाधव या फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घरात कुटुंबाचे वास्तव्य
ममता पटेल काही दिवसांनी बोरिवलीतील घर पाहण्यासाठी गेल्या असता तेथे एक कुटुंब राहत असल्याचे आढळले. याबाबत त्यांनी जाब विचारला; त्यावेळी चौघा भामट्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 51 lakh Fraud happened with woman showing the bait of a large house