बुलेट ट्रेनसाठी 53 हजार तिवरांची कत्तल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुमारे 53 हजार 467 तिवरांच्या कत्तलीच्या प्रस्तावास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्त्वतः हिरवा कंदील दाखवला आहे.

मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुमारे 53 हजार 467 तिवरांच्या कत्तलीच्या प्रस्तावास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्त्वतः हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत ही झाडे आहेत. राज्यातील 18.92 हेक्‍टर वन जमिनीवरील एक लाख 50 हजार 752 तिवरे तोडण्याचा मूळ प्रस्ताव आहे. 

"नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन'तर्फे नुकतीच ही माहिती न्या. भूषण गवई व न्या. एस. नायडू यांच्या खंडपीठाला देण्यात आली. पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीसमोर या निर्णयावर सुनावणी होऊन त्यांनी अंतिम निर्णय दिल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती कॉर्पोरेशनचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी खंडपीठाला दिली. खंडपीठासमोर पुढील सुनावणी सुट्टीनंतर होणार असल्याने त्यानंतरच वृक्षतोडीबाबतचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. 

कॉर्पोरेशनने डिसेंबरमध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऍथॉरिटीकडे ही तिवरे तोडण्याचा प्रस्ताव दिला होता; मात्र यासाठी उच्च न्यायालयाची संमती आवश्‍यक असल्याचे सांगून ऍथॉरिटीने प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे कॉर्पोरेशनने उच्च न्यायालयात याचिका केली. दरम्यान, ऍथॉरिटीने 53 हजार तिवरे तोडण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यावर त्यास पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळवावी, असे उच्च न्यायालयाने मार्च महिन्यात कॉर्पोरेशनला सांगितले होते. त्यास पर्यावरण मंत्रालयाने संमती दिल्याचे कॉर्पोरेशनने खंडपीठाला सांगितले. 

131 हेक्‍टर जंगल बाधित होणार 
नियमानुसार प्रकल्पासाठी झाडे तोडल्यास तोडलेल्या झाडांच्या तिप्पट झाडे लावणे आवश्‍यक आहे; मात्र आम्ही तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडे लावू अशी हमीदेखील कॉर्पोरेशनच्या वकिलांनी दिली होती. त्यामुळे आता तिवरे तोडल्यास किमान दीड लाख ते कमाल साडेचार लाख तिवरे लावावी लागतील. 508 किलोमीटरच्या या बुलेट ट्रेनच्या मार्गापैकी 155 किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. त्यामुळे 32 हेक्‍टर तिवरांच्या जंगलासह 131 हेक्‍टर जंगल बाधित होणार आहे. यापैकी 18 हेक्‍टरवरील एक लाख 50 हजार 752 तिवरे तोडावी लागणार आहेत. सीआरझेड विभागातून जाणाऱ्या बुलेटच्या 32.43 किलोमीटर मार्गापैकी 8.39 किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे.

Web Title: 53 thousand turtles for bullet train