सुधागडमध्ये 57 जुगाऱ्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

मौजमस्ती व जलद आर्थिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने खेळल्या जाणाऱ्या या जुगाऱ्यांवर झालेल्या कारवाईने साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत. अड्डा चालविणारे व त्यांना याकामी मदत करणारे साथीदार यांच्या अंगझडतीत मिळालेली रक्कमदेखील या वेळी जप्त करण्यात आली. 

पाली : गणेशोत्सवात जुगाराचे अड्डे चालवणाऱ्या समाजकंटकांच्या मुसक्‍या आवळण्यास रायगड पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यानुसार सुधागड तालुक्‍यातील वाफेघरमधील अड्ड्यावर शुक्रवारी (ता. 30) पहाटे छापा टाकून तब्बल 57 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईत पावणेदोन लाख रुपयांची रोख रक्कम आणि वाहने जप्त केली आहेत. कारवाईमुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

वडखळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजित शिंदे आणि पाली पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह पोलिस पतकाने कारवाई केली. त्यासाठी सर्वात आधी जुगाराचा अड्डा सुरू असलेल्या वाफेघर येथील एका घरात प्रवेश करून झडती घेण्याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी रोहा विभाग यांच्याकडून पोलिसांनी झडती वॉरंट मिळवले होते. 

त्यानंतर अजित शिंदे, पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार पाटील, दिनेश भोईर, अमोल म्हात्रे, सचिन वावेकर, महिला पोलिस नाईक तृप्ती चवरकर, महिला पोलिस सरोज दिवकर आदींनी घरात प्रवेश केला. त्या वेळी प्रत्येक हॉल, ओटी आणि स्वयंपाक घरातही जुगार सुरू असल्याचे दिसले. 

मौजमस्ती व जलद आर्थिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने खेळल्या जाणाऱ्या या जुगाऱ्यांवर झालेल्या कारवाईने साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत. अड्डा चालविणारे व त्यांना याकामी मदत करणारे साथीदार यांच्या अंगझडतीत मिळालेली रक्कमदेखील या वेळी जप्त करण्यात आली. 

कारवाईत 1 लाख 75 हजार रोख रक्कम, एक कार आणि 10 मोटारसायकल जप्त केल्या. सुधागड तालुक्‍यात अशा प्रकारे राजरोसपणे सुरू असलेले जुगाराचे अड्डे मोठा चिंतेचा विषय बनला आहे. अशा प्रकारे इतरही छोटे-मोठे जुगाराचे अड्डे सुरू असल्याची चर्चा आहे. 

याप्रकरणी पाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम 4 व 5 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाली पोलिस सहाय्यक निरीक्षक तृप्ती बोराटे करीत आहेत. 
पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 57 gamblers arrested in Sudhagad