बेफिकिरीचा ‘हिमालय’!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

मृतांची नावे
अपूर्वा प्रभू (३५), झहिद शिरा खान (३०), रंजना तांबे (४०), भक्ती शिंदे (३५), मोहन कायगुडे (४०) आणि तपेंद्र सिंग (३५) अशी मृतांची नावे आहेत. मृतांपैकी अपूर्वा, रंजना आणि भक्ती या जीटी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.

सीएसटीजवळ पादचारी पूल कोसळून सहा ठार; ३५ जखमी
मुंबई - सर्वसामान्य मुंबईकरांच्या जगण्या-मरण्यातील सेतूंनाच प्रशासकीय बेफिकिरीची वाळवी लागल्याचे गुरुवारी पुन्हा एकदा दिसून आले. एल्फिन्स्टन स्थानकावरील दुर्घटनेनंतर तरी याबाबत सरकार आणि प्रशासनाला जाग आली असेल, असे सर्वांनाच वाटत असतानाच महापालिकेच्या इमारतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘हिमालय’ नामक पादचारी पुलाचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. सर्वच यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे गुरुवारी सायंकाळी ७.२० वाजता झालेल्या या दुर्घटनेत तीन महिलांसह सहा सर्वसामान्य नागरिकांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले. ३५ जणांना गंभीर दुखापती झाल्या. 

या दुर्घटनेमुळे मुंबईकरांतून हतबल संतापाची भावना व्यक्त होत असून, दुसरीकडे मात्र या पूलदुर्घटनेस जबाबदार कोण, याबाबत नेहमीप्रमाणेच टोलवाटोलवीचे राजकारण सुरू झाले आहे.

टाईम्स ऑफ इंडिया इमारत आणि अंजुमन-ए-इस्लाम शाळेकडील बाजूचा हिमालय पुलाचा भाग कोसळला. त्यात पुलावरून जाणारे पादचारी पुलाच्या भागासह रस्त्यावर कोसळले. या वेळी पुलाखालून जाणाऱ्या पादचाऱ्यांवरही हा भाग कोसळल्याने दुर्घटनेतील जखमींची संख्या वाढली. या पुलाचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ झाले की नाही, याबाबत माहिती नसल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. दुर्घटनेनंतर प्रवाशांची धावपळ उडाली. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तत्काळ सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात हलवण्यात आले. कोसळलेला ढिगारा दुर्घटनास्थळावरून हटवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले. 

सायंकाळची वेळ असल्याने परिसरात गर्दी होती. त्या वेळी पुलावरून काही लोक कोसळले. पुलाखाली केळी विकणारी महिला आणि मुलीसह जाणारी पादचारी महिला होती. त्यांच्यावर पुलाचा भाग कोसळला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दुर्घटनेत टॅक्‍सीसह दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. पूल कोसळल्यामुळे जेजे उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक पूर्णबंद  बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक आझाद मैदान व पी. डिमेलो मार्गाने वळव्यात आली. 

मृतांच्या वारसांना पाच लाख - मुख्यमंत्री
सीएसएमटीतील पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जखमींच्या औषधोपचारांचाही संपूर्ण खर्च केला जाईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
सीएसएमटी १९८० मध्ये बांधलेल्या पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये सुचविण्यात आले होते. असे असतानाही एवढी मोठी दुर्घटना होते. याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नक्की काय घडले? 
पादचारी पुलाचा भाग कोसळून ४० ते ५० जण पुलावरून कोसळले.
पुलाखालील टॅक्‍सीचा चक्काचूर; चालक बचावला.
सात ते १० मिनिटांत बचाव कार्य सुरू
रात्री ११ वाजेपर्यंत पुलाचा ढिगारा उचलण्याचे काम 

पुन्हा टोलवाटोलवी!
पालिकेने पुलाचे ऑडिट करून दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडे ‘ना हरकत’ मागितली होती; मात्र ती अद्याप मिळाली नाही, असा दावा महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केला, तर याबाबत माहिती घेऊन सांगू असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिका आणि रेल्वे प्रशासनात असेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनीही महापौरांची ‘री’ ओढली. पुलाच्या दुरुस्तीबाबत रेल्वे प्रशासनालाही दोन वर्षांपूर्वी पत्र दिले होते; मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. या दुर्घटनेला तेच जबाबदार आहेत, असा आरोपही सानप यांनी केला.

सिग्नलमुळे  अनर्थ टळला!
हिमालय पुलाचा भाग कोसळला, नेेमक्या त्याच्या काही क्षण आधी त्या रस्त्यावरील सिग्नल लाल झाला. त्यामुळे सर्व वाहने उभी राहिली. तरीही पुढे आलेल्या दोन वाहनांवर पुलाचा स्लॅब कोसळलाच. या घटनेतून टॅक्‍सीचालक वाचला. त्यावेळी सिग्नल सुरू असता, तर मात्र पुलाखालील वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन मोठी जीवितहानी झाली असती.

अश्रू, संताप आणि टाहो...
जखमींमध्ये स्वत:चा नातेवाईक आहे का, याचा शोध घेणाऱ्या डोळ्यांमध्ये अश्रूंबरोबरच यंत्रणेविरोधातील संतापही दिसत होता. एखादा जखमी रुग्णवाहिकेतून आल्यावर रुग्णालयात जमलेल्या नजरा त्याकडे वळत होत्या. अचानक मृत व्यक्तींची नावे फलकावर लावण्यात आली आणि त्यानंतर एकच टाहो फुटला.

सीएसएमटी पूल दुर्घटनेतील १६ जणांना जीटी रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील याच रुग्णालयातील परिचारिका अपूर्वा प्रभू (३२) आणि अंजना ताबे (४८) या दोघींचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. इतर १४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच रोज या मार्गाने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. संध्याकाळी ७.३० वाजता दुर्घटना घडल्यानंतर तासाभरात रुग्णालयात गर्दी झाली होती. प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीचा शोध घेत होता. रुग्णवाहिका आल्यावर प्रत्येकाच्या नजरा त्यातून उतरणाऱ्या स्ट्रेचरकडे वळत  होत्या. जीटीमध्ये शोध नाही लागला तर तत्काळ सेंट जॉर्जेस रुग्णालय गाठले जात होते. हा शोध काही काळ सुरूच होता. जमलेल्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. त्यातून व्यवस्थेविरोधातील चिडही  दिसत होती. 

Web Title: 6 killed Pedestrian bridge collapses near CST