६७० बालकामगारांच्या चेहऱ्यावर ‘स्माईल’

मंगेश सौंदाळकर
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

मुंबई - मुलांना कोवळ्या वयात शिक्षण देण्याऐवजी त्यांना कामाला जुंपणाऱ्या ठेकेदारांना मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी दहा महिन्यांत कारवाई करून तब्बल ६७० बालकामगारांची सुटका केली आहे. बालकांना कामाला जुंपणाऱ्या ४५६ जणांना गजाआड केले. पोलिसांची धडक मोहीम सुरूच राहणार असून, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

मुंबई - मुलांना कोवळ्या वयात शिक्षण देण्याऐवजी त्यांना कामाला जुंपणाऱ्या ठेकेदारांना मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी दहा महिन्यांत कारवाई करून तब्बल ६७० बालकामगारांची सुटका केली आहे. बालकांना कामाला जुंपणाऱ्या ४५६ जणांना गजाआड केले. पोलिसांची धडक मोहीम सुरूच राहणार असून, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

बालकांच्या हक्कांचे उल्लंघन होऊ नये म्हणून देशात बालकामगार प्रतिबंध कायदा आहे. बालमजुरी होऊ नये, मुलांचे शोषण होऊ नये याची खबरदारी पोलिस घेतात. त्यासाठी विशेष बालसाह्य केंद्र शहरात आहे. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी विशेष अभियान हाती घेतले. परिणामी मुंबईत बालकामगारांचे प्रमाण घटले. गरिबी, शिक्षणाचा अभाव, लहानपणीच कुटुंबीयांचे हरवलेले छत्र आदी प्रतिकूल गोष्टींचा फायदा घेऊन बालकांना पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, नेपाळ आणि बिहारमधून मुंबईत कामासाठी आणले जाते. झोपडपट्ट्यांमधील कारखान्यांत जरीकाम, लेदरवर्क, हॉटेल आदी ठिकाणी त्यांना राबवले जाते. त्यांना त्याचा मोबदलाही दिला जात नाही.त्यांचे शोषण केले जाते, अशा तक्रारी सामाजिक संस्थांनी समाजसेवा शाखेकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन समाजसेवा शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या टीमने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला. दहा महिन्यांत छापे मारून ६७० बालकामगारांची सुटका केली. काही दिवसांपूर्वी बिहारहून मुंबईला आणण्यात आलेल्या २६ बालकांची सुटका केली होती.

कामगिरी आकड्यांत...
वर्ष     अटक आरोपी  बालकांची सुटका 
२०१३     १७४    ३२९
२०१४     ४४१    ८४६
२०१५     ७१८    १,०३९
२०१६     ४५६    ६७०
(ऑक्‍टो.पर्यंत) (आकडेवारी मुंबई पोलिसांची)

‘जापू’ची कारवाई
वर्षे      मूल    मुली 

२०१३  ११२  ४३
२०१४  १३६  ३१
२०१५  ४१९  ३८
२०१६  ३८९  २३
(ऑक्‍टो.पर्यंत)

५१ बालकांची यादी
कौटुंबिक कलह, अभ्यासाचा कंटाळा आदी कारणांमुळे परराज्यातील मुले मुंबईत पळून येतात. त्यांना बालसुधारगृहात ठेवले जाते. महिला व बालकल्याण समितीच्या आदेशानुसार त्यांचा शोध ‘जापू’ (बाल साह्य संरक्षण विभाग) विभागाचे अधिकारी घेतात. यंदा ‘जापू’च्या अधिकाऱ्यांनी ५१ बालकांची यादी तयार केली. त्यानुसार त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, ‘जापू’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतून तीन मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले. ‘जापू’ने दहा महिन्यांत ३८९ मुले व २३ मुलींना पालकांकडे स्वाधीन केल्याची नोंद आहे. समाजसेवा शाखेनेही एका मुलीची सुटका केली. २०१५ मध्ये ‘जापू’ने कारवाई करून ४१९ मुले आणि ३८ मुलांची सुटका केल्याची नोंद आहे.

Web Title: 670 child labor in the face of 'Smile'