मुंबई - चीनमधून गृहोपयोगी वस्तूंमध्ये सोने लपवून भारतात आणल्याप्रकरणी दोन चिनी नागरिकांसह चौघांना महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अटक केली आहे. आरोपींकडून 21 किलो सोने व 35 किलो चांदी हस्तगत करण्यात आली असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सात कोटी रुपये असल्याची माहिती डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी दिली.
वांग ग्युंगेन, वेंग शुनझेन, कमर अब्बास सय्यद आणि दहिसर येथील सराफ मिहिर मेहता अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने व चांदीच्या पट्ट्या, साखळ्या, क्लिप आदी वस्तू गृहोपयोगी वस्तूंमध्ये लपवून चीनमधून तस्करीच्या मार्गाने भारतात आणल्या जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार डीआरआयने अंधेरी पूर्व येथील मरोळ येथील सदनिकेतून वांग ग्युंगेन आणि वेंग शुनझेन यांना अटक करून पार्सल हस्तगत केले.
|