
Hydropower Projects : ‘जलविद्युत’साठी ७१ हजार कोटींचे करार; ३० हजार रोजगार निर्मिती, १३५०० मेगावॉट वीज मिळणार
मुंबई : महाराष्ट्रात जलविद्युत प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कॉर्पेारेशनच्या (एनएचपीसी) माध्यमातून विद्युतनिर्मितीचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पठारातही काही महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु केले जातील. या संदर्भात आज सामंजस्य करार करण्यात आले. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांत एवढे मोठे प्रकल्प राज्य पातळीवर प्रथमच सुरू केले जात आहेत. एकूण ३० हजार रोजगार यातून निर्माण होणार असून, एकूण गुंतवणूक ही ७१ हजार कोटी रुपये असणार आहे.
राज्यात उदंचन (पंपिंग स्टोअरेज) जलविद्युत प्रकल्पासंदर्भात आज ७१ हजार कोटी रुपयांचे करार करण्यात आले, त्यानंतर सह्याद्री अतिथिगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य नवनव्या हरित ऊर्जा तसेच अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून प्रगतिपथावर अग्रेसर होत असल्याचे नमूद केले.
नॅशनल हायड्रो पॉवर कार्पोरेशनच्या माध्यमातून ४४ हजार कोटी रुपयांचे ७३५० मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार असून, खासगी टोरंट पॉवर लि. कंपनीच्या माध्यमातून ५७०० मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प, २७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात येणार आहेत.
हे प्रकल्प नवीनीकरणीय ऊर्जेचा भाग असून, जागतिक स्तरावर आता अपारंपरिक ऊर्जा निर्मितीकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. केंद्र सरकारचा सुद्धा यासाठी आग्रह आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात हे करार असून एवढी गुंतवणूक अन्य कुठल्याही राज्यात आलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
गुंतवणुकीत क्रमांक पहिला
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, कालच ‘एफडीआय’ची आकडेवारी आली. महाविकास आघाडीच्या काळात कधी कर्नाटक तर कधी गुजरात क्रमांक एकवर होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करू, हे आम्ही आधीपासून सांगत होतो.
आता आलेल्या ताज्या आकडेवारीतून महाराष्ट्र पुन्हा क्रमांक एकचे राज्य बनले आहे. उद्योग बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना हे उत्तर आहे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
असे असतील प्रकल्प
नॅशनल हायड्रोमार्फत
सावित्री ( २२५० मेगावॉट ), काळू (११५० मेगावॉट), केंगाडी (१५५० मेगावॉट), जालोंद (२४०० मेगावॉट),
टोरंट पॉवर लि. मार्फत
कर्जत (३००० मेगावॉट), मावळ (१२०० मेगावॉट), जुन्नर (१५०० मेगावॉट)