विद्यार्थ्यांची 800 मंडळांना अग्निसुरक्षा 

विद्यार्थ्यांची 800 मंडळांना अग्निसुरक्षा 

मुंबई - अंधेरीतील सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या महाविद्यालयातील अभियांत्रिकीचे 250 विद्यार्थी यंदा मुंबईतील 800 गणेशोत्सव मंडळांच्या अग्निसुरक्षेची व्यवस्था चोखपणे सांभाळत आहेत. फायर ऍण्ड सिक्‍युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाने त्यांना खास प्रशिक्षण दिले आहे. 

मुंबईत गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी लाखो भाविक विविध मंडळांना भेटी देतात. त्यांच्या सुरक्षेसाठी फायर ऍण्ड सिक्‍युरिटी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे गणेशोत्सव मंडळांना अग्निसुरक्षेचे आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षणही देण्यात येते. याशिवाय यंदा हे विद्यार्थी अग्निसुरक्षेची आघाडी सांभाळत आहेत. 

फायर ऍण्ड सिक्‍युरिटी असोसिएशन ही सेवाभावी संस्था आहे. त्यांच्या वतीने आठ वर्षांपासून गणेश मंडळांचे सुरक्षा ऑडिट केले जाते. संस्थेने सुरू केलेल्या स्टुडंट चॅप्टरचे हे पहिलेच वर्ष आहे. अभियांत्रिकी, दूरसंचार, माध्यमे, तसेच माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यात समाविष्ट केले जाणार आहे. स्टुडंट चॅप्टरचे प्रमुख पराग मोमया यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. 

सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे डीन डॉ. राठोड म्हणाले की, "मुंबईतील गणेश मंडळांची वाढती संख्या लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेची गरज आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी फायर ऍण्ड सेफ्टी ऑडिटचे प्रशिक्षण घेऊन एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.' 

याची दक्षता 
- योग्य ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरा लावणे. 
- रोषणाईच्या वायरिंगची तपासणी. 
- आग विझवण्याच्या साधनांची तपासणी. 
- आपत्कालीन वेळी बाहेर निघण्याची व्यवस्था. 
- मेटल डिटेक्‍टर सुरक्षा यंत्रणा. 

आम्ही आपत्कालीन परिस्थितीत उपाय करण्याचे प्रशिक्षण मंडळांच्या कार्यकर्त्यांना देत असतोच; याच जोडीला आता युवकांना सहभागी केले आहे. तरुणाईकडे असलेली अफाट इच्छाशक्ती हाच केंद्रबिंदू मानून आम्ही कॉलेजमधील युवकांना या कार्यात जोडले आहे. 
- श्रेयश सरमळकर, प्रमुख आर्किटेक्‍ट (ब्रॅंडिंग), फायर ऍण्ड सिक्‍युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com