शिवाजीनगरात 88 कोटींच्या पाण्याची विक्री 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

मुंबई - महापालिकेच्या "एम पूर्व' प्रभागातील शिवाजीनगरामधील सुमारे 50 टक्के नागरिकांचे दरमहा उत्पन्न 6 हजारांपेक्षा कमी आहे; तरीही येथे वर्षाला तब्बल 88 कोटींचे पाणी विकले जाते, अशी धक्कादायक माहिती "अपनालय'च्या अहवालात आहे. यामुळे झोपडपट्ट्यांत पाण्याचा प्रश्‍न किती गंभीर आहे, हे दिसून आले आहे. 

मुंबई - महापालिकेच्या "एम पूर्व' प्रभागातील शिवाजीनगरामधील सुमारे 50 टक्के नागरिकांचे दरमहा उत्पन्न 6 हजारांपेक्षा कमी आहे; तरीही येथे वर्षाला तब्बल 88 कोटींचे पाणी विकले जाते, अशी धक्कादायक माहिती "अपनालय'च्या अहवालात आहे. यामुळे झोपडपट्ट्यांत पाण्याचा प्रश्‍न किती गंभीर आहे, हे दिसून आले आहे. 

"अपनालय' संस्थेने शिवाजीनगरातील नागरिकांच्या आयुष्यावर आधारित तयार केलेल्या "लाईफ ऑन दि मार्जिन : चार्टिंग रिअलिटीज' या अहवालाचे प्रकाशन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते गुरुवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात करण्यात आले. या वेळी "अपनालय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरुण कुमार यांनी अहवालातील महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरण केले. शिवाजीनगरात सहा लाख लोक राहत असून त्यांचे दरमहा उत्पन्न सहा हजारांहून कमी आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न सुमारे 40 रुपये आहे. दोन लाख 10 हजार लोकांकडे शिधापत्रिकाच नसल्याने त्यांना सार्वजनिक योजनांचा फायदा मिळत नाही. या विभागातील 50 टक्के बाळे कमी वजनाची आहे. अर्ध्याहून अधिक मुले अशिक्षित आहेत. 6 ते 14 वर्षे वयोगटातील 29 टक्के मुले शाळेत जात नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. 

18 वर्षांआधीच विवाह 

शिवाजी नगरातील लोकांचे सरासरी वय 22 वर्षे 3 महिने आहे. 47 टक्के लोकसंख्या 18 वर्षांखालील आहे, असेही अहवालात म्हटले आहे. 38 टक्के मुलींचा विवाह 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. 

पाण्यासाठी दररोज 30 रुपयांचा खर्च 

शिवाजीनगरातील नागरिकांना दररोज पिण्यासाठी आणि अन्य गरजांसाठी पाणी विकत घ्यावे लागते. 74 टक्के कुटुंबे दररोज पाण्यासाठी 30 रुपये खर्च करतात. 17 टक्के कुटुंबे 31 ते 50 रुपये, 5 टक्के कुटुंबे 50 ते 100 रुपये आणि 4 टक्के कुटुंबे 100 रुपये दररोज पाण्यासाठी खर्च करतात. दररोज 24 लाख 43 हजार 110 रुपयांचे पाण्याचे अर्थकारण येथे चालते. दरमहा 7 कोटी 32 लाख 93 हजार 300 रुपये आणि वर्षाला 87 कोटी 95 लाख 19 हजार 600 रुपयांचे पाणी येथील रहिवासी घेतात. 

शाळा, रुग्णालय नाही 

येथील 50 टक्के लोकसंख्या 20 वर्षे वयाखालील असूनही येथे माध्यमिक शाळा नाही. आजुबाजूच्या शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण 29 टक्के आहे. येथे एकही रुग्णालय नाही.

Web Title: 88 million sale of water in Shivajinagar