जुगार खेळणार्‍या नऊ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

महाड तालुक्‍यातील बिरवाडी येथे जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

महाड (बातमीदार) : महाड तालुक्‍यातील बिरवाडी येथे जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (ता. ११) पहाटे झाली.

बिरवाडी येथील जुनी बाजारपेठ या ठिकाणी गणेशोत्सवाच्या नावाखाली जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा रायगड आणि महाड एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी आणि कर्मचारी; तसेच स्थानिक गुन्हे शाखा रायगड यांचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे बुधवारी पहाटेच्या सुमारास बिरवाडी जुनी बाजारपेठ येथे छापा घातला. यात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पत्ते (कॅट) व सुमारे २८ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. या नऊ जणांविरोधात महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 people arrested for glambling