चौपाट्यांवर आता जागते रहो... 

चौपाट्यांवर आता जागते रहो... 

मुंबई - मुंबईच्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे; मात्र समुद्रकिनाऱ्याच्या फेसाळत्या पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या वेडापायी पर्यटक जीव धोक्‍यात घालत आहेत. अपघातांची संख्या वाढू लागल्याने चौपाट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन चौपाट्यांवर कडक सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी गोव्याच्या धर्तीवर खासगी कंत्राटदारांकडून सुमारे 93 तंत्रकुशल जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत. त्यासाठी पालिका 13 कोटी खर्च करणार आहे. 

मुंबईच्या गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्‍सा, मनोरी आणि गोराई अशा सातही चौपाट्यांवर दररोज मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी होते. त्या ठिकाणी पालिकेचे 36 जीवरक्षक दोन पाळ्यांमध्ये तैनात असतात. त्यातील 12 जीवरक्षक कामयस्वरूपी असून इतरांची नेमणूक कंत्राटी स्वरूपात करण्यात आली आहे. चौपाट्यांवर पालिकेकडून जीवरक्षक तैनात करण्यात आले असले तरी अनेकदा अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानी वा दुर्घटना घडतात. त्या पार्श्‍वभूमीवर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर असलेली जीवरक्षकांची सुरक्षाव्यवस्था मुंबईत करण्यात येणार आहे. खासगी कंपनीकडून त्याप्रमाणे तंत्रकुशल जीवरक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गोव्याच्या धर्तीवर अशी सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार असून त्यावर 13 कोटी नऊ लाख 71 हजार खर्च करण्यात येणार आहेत. मे. दृष्टी लाईफ सेव्हिंग प्रा. लि. खासगी कंपनीची तीन वर्षांकरिता निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, असा त्यामागचा उद्देश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जीवरक्षकाच्या नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे. 

अशी असेल सुरक्षा 
- मुंबईच्या सातही चौपाट्यांवर 93 जीवरक्षक नेमणार 
- जीवरक्षकांकडे लाईफ जॅकेट, दोरखंड, सेफ्टी ट्यूब, रिंग आदी सुविधा असतील. 
- सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 4 ते रात्री 12 अशा वेळेत जीवरक्षक चौपाट्यांवर तैनात असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com