आकाश कंदिलांचा झगमगाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

दहा दिवसांवर दिवाळी आली असून, त्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.

माणगाव (बातमीदार) : दहा दिवसांवर दिवाळी आली असून, त्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. विविध रंगाचे कागदी, कापडी आणि प्लास्टिकच्या कंदिलांचा तर झगमगाट आतापासूनच माणगाव बाजारपेठांत दिसत आहे. मात्र, लांबलेला पाऊस व शेतीचे झालेले नुकसान यामुळे दिवाळीच्या खरेदीला नागरिकांनी पाठ फिरवल्याचे सध्याचे चित्र आहे.

दिवाळीमध्ये आकाश कंदील, पणत्या, विविध प्रकारच्या सजावटीचे साहित्य, दिवे व रांगोळ्या, रंग यांना चांगली मागणी असते. दिवाळीसाठी ग्राहकांच्या पसंतीच्या वस्तू माणगावातील दुकानातून विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. विविध रंगांचे, आकारातील, कागदी, कापडी व प्लास्टिकमधील आकाश कंदील बाजारात अाले आहेत. पूर्वी हाताने तयार केलेले आकाश कंदील आता रेडीमेड बनवलेले घेण्यास ग्राहकांची पसंती आहे. तयार वस्तूंची मागणी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी दुकानातून तशा प्रकारच्या वस्तू ठेवण्यास सुरुवात केली आहे. आकाश कंदील कमीतकमी ५० रुपयांना उपलब्ध असून, पणत्या पाच, दहा रुपयांना मिळत आहेत.

१० दिवसांवर दिवाळी असताना नेहमीप्रमाणे खरेदीचा असलेला उत्साह आणि लगबग बाजारात दिसत नाही. यंदा लांबलेला पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीला सध्या तरी नागरिकांचा ओघ कमी दिसत आहे.

दिवाळीसाठी आवश्‍यक असणाऱ्या वस्तू आम्ही मांडून ठेवल्या आहेत. आकाश कंदील व इतर वस्तूंच्या किमती गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. मात्र, ग्राहकांची संख्या सध्या तरी कमी आहे.
- अभिजित जनरल स्टोअर्स, माणगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aakash Kandil News