आमीर खानला सरसंघचालकांच्या हस्ते पुरस्कार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

आमीर याआधी 16 वर्षापुर्वी 'लगान' चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, त्यावेळी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होता. पण त्यानंतर त्याने एकाही पुरस्कार सोहळ्यास हजेरी लावलेली नव्हती.

मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता आमीर खानने तब्बल 16 वर्षानंतर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

'दंगल' चित्रपटातील उत्कृष्ट भुमिकेसाठी आमीरला भागवत यांच्या हस्ते दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांच्या खास आग्रहास्तव आमीर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला होता. मुंबईमध्ये दिनानाथ मंगेशकर यांच्या 75व्या पुण्यतिथी निमित्त या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या पुरस्कार सोहळ्यात आमीर खानच्या 'दंगल' चित्रपटातील भुमिकेसाठी विशेष पुरस्कार देउन त्याला गौरविण्यात आले. आमीर याआधी 16 वर्षापुर्वी 'लगान' चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, त्यावेळी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होता. पण त्यानंतर त्याने एकाही पुरस्कार सोहळ्यास हजेरी लावलेली नव्हती.

यावेळी आमीरने त्याच्या यशाचे श्रेय चित्रपटाच्या लेखकांचे आहे असे सांगितले. चित्रपटांचे दिग्दर्शक आणि लेखक यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहचू शकलो. त्या सर्वांचा मी मनापासुन आभारी आहे, असे तो म्हणाला. 

या पुरस्कार सोहळ्यादरम्यान माजी क्रिकेटपटू कपिल देव तसेच प्रख्यात अभिनेत्री वैजयंतीमाला यांनाही पुरस्कार देउन गौरविण्यात आले.
 

Web Title: Aamir Khan receives award from Mohan Bhagwat