वीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नक्षलवाद्यांच्या तावडीतून तरुणाची सुटका, वालीव पोलिसांनी पश्‍चिम बंगालमधून सोडवले.

मुंबई : वसईतील शमशुल खान या तरुणाला 20 लाखांच्या खंडणीसाठी पश्‍चिम बंगाल येथील नक्षलवाद्यांनी डांबून ठेवले होते. नक्षलवाद्यांच्या तावडीतून या तरुणाची सुखरूप सुटका करण्याची स्तुत्य कामगिरी वालीव पोलिसांनी केली आहे. 
शमशुल खान याचा काही कामानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक सैफुल खान याच्यासोबत बोलणे झाले. सैफुलने शमशुलला झारखंड येथे मोठे सरकारी कंत्राट मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून हावडा आणि तेथून फराका रेल्वेस्थानकावर बोलावले. तेथे तीन जण टॅक्‍सी घेऊन आले आणि सैफुलने सांगितल्याप्रमाणे तो त्या तिघांसोबत रिक्षात बसला. त्यानंतर सैफुलचा मोबाईल बंद झाल्याने शमशुलचा त्याच्यासोबतचा संपर्क तुटला. त्या तिघांनी शमशुलला घनदाट जंगलात गेले. तिथून अन्य दोघांसोबत त्याला तीन तास पायी चालवत एका अड्ड्यावर नेण्यात आले. तेथे पाच जणांनी शमशुलला बेदम मारहाण केली आणि तुझ्यामुळे आमच्या कंत्राटाचे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगून हे पैसे मागण्यासाठी त्याला वडिलांना फोन करायला सांगितले. 
शमशुलच्या वडिलांकडे मुलाच्या सुटकेसाठी 20 लाखांची मागणी करण्यात आली. त्यांनी तातडीने याबाबत वालीव पोलिसांना माहिती दिली. 

कशी केली शमशुलची सुटका? 
वालीव पोलिसांनी शमशुलच्या सुटकेसाठी सहा जणांचे एक पथक तयार केले. हे पथक पश्‍चिम बंगालमधील मालदा या ठिकाणी पाठवण्यात आले. शमशुलच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना धमक्‍यांचे फोन येत असल्याने त्यांनाही पोलिसांनी सोबत घेतले. येणाऱ्या कॉलचा मागोवा घेत हे पथक पश्‍चिम बंगालच्या काल्याचक पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथील पोलिसांच्या मदतीने शमशुलची सुखरूप सुटका करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abduction near mumbai