प्रदूषणकारी ७२ कारखान्यांना अभय

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

हरित लवादाच्या निर्णयाला महावितरणकडून केराची टोपली; नागरिक संतप्त  

पनवेल : हरित लवाद आणि प्रदूषण महामंडळ यांनी दिलेल्या आदेशानंतरही महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रदूषणात दोषी ठरवण्यात आलेल्या कारखानदारांची वीज बंद करण्यात आली नाही. त्यामुळे महावितरण अधिकारी कारखानदार करत असलेल्या गैरप्रकारात भर घालण्याचे काम करत असल्याचे प्रदूषण महामंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या कारखान्यांच्या यादीवरून समोर येत आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे वसाहत परिसरात राहणारी जनता मेटाकुटीस आली आहे. औद्योगिक परिसरातील रासायनिक कारखान्यांमधून प्रक्रिया न करताच सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे वसाहत परिसरातील नदी-नाल्यांमधील जैवविविधता नष्ट होत असल्यामुळे प्रदूषणाविरोधात हरित लवादात गेलेल्या नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या याचिकेवर करण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान प्रदूषणप्रकरणी दोषी ठरलेल्या ७२ कारखान्यांना क्‍लॉसर नोटीस बजावत कारखान्यांची वीज व पाणी बंद करण्याचे आदेश प्रदूषण मंडळास हरित लवादाकडून देण्यात आले होते.

लवादाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना केला जाणारा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना महावितरण विभागाला प्रदूषण महामंडळाकडून करण्यात आल्या होत्या; तर पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना औद्योगिक विकास महामंडळाला करण्यात आल्यामुळे कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.त्‍यामुळे कंपन्या खासगी टँकर मागवत आहेत; मात्र विद्युतपुरवठा बंद करण्यात आलेला नसल्याने प्रदूषणात दोषी आढळलेले कारखाने बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याच्या दृष्टीने काही सूचना करण्यात आल्या आहेत का, याबाबतची माहिती महावितरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच मिळू शकेल. मला याबाबत माहिती नाही.
- वैभव सिंग, अधिकारी, महावितरण, तळोजा विभाग

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abductive pollution 72 factory