भाजपने प्रवेश नाकारलेले काँग्रेस आमदार शिवसेनेच्या वाटेवर?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

- अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
- सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन घेतली भेट
- ठाकरे आणि सत्तार या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा

मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सत्तार या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सत्तार यांनी पक्षाविरोधी प्रचार केल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची इच्छा दर्शविली. परंतु, सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध झाला होता. सत्तार यांच्या राजकीय भवितव्याबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात खलबते सुरु आहेत असेही बोलले जात आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा विरोध लक्षात घेत मुख्यमंत्र्यांकडून सत्तार यांचे शिवसेनेत राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. भाजपने पक्षप्रवेश नाकारलेले सत्तार शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशा चर्चाही आता रंगू लागल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abdul sattar meet uddhav thackeray in mumbai